जेट एअरवेज आणि किंगफिशरला एअरलाईन्सला वेगळा न्याय का? माल्ल्याचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 07:17 AM2019-03-26T07:17:23+5:302019-03-26T07:22:15+5:30

जेट एअरवेजला मदत करताय, मग किंगफिशर एअरलाईन्सला का केली नाही; माल्ल्याचा एनडीए सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप

Double standards under NDA vijay mallya alleges says jet airways getting all help from public sector banks | जेट एअरवेज आणि किंगफिशरला एअरलाईन्सला वेगळा न्याय का? माल्ल्याचा सरकारला सवाल

जेट एअरवेज आणि किंगफिशरला एअरलाईन्सला वेगळा न्याय का? माल्ल्याचा सरकारला सवाल

Next


नवी दिल्ली: जेट एअरवेजला मदत करणाऱ्या सरकारनं किंगफिशर एअरलाईन्सला का मदत केली नाही, असा सवाल उद्योगपती विजय माल्ल्यानं उपस्थित केला आहे. जेट एअरवेज अडचणीत असताना सरकारी बँका मदतीला धावल्या आहेत. हे चित्र पाहून छान वाटतं. मात्र हीच मदत किंगफिशर एअरलाईन्स अडचणीत असताना का करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारत माल्ल्यानं एनडीए सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. माल्ल्यानं ट्विटरवरुन जेट प्रकरणावर भाष्य केलं आहे. 




विजय माल्ल्यानं चार ट्विट करत जेट एअरवेज आणि किंगफिशर एअरलाईन्सला वेगळा न्याय का, असा प्रश्न विचारला. 'जेट एअरवेज वाचवण्यासाठी सरकारी बँकांकडून मदत केली जात आहे. रोजगार वाचावेत यासाठी बँकांची धडपड सुरू आहे. किंगफिशर एअरलाईन्सच्या बाबतीतही हेच व्हायला हवं होतं,' असं माल्ल्यानं ट्विटमध्ये म्हटलं. त्यानं यावरुन भाजपा सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. 'भाजपाचे प्रवक्ते मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहिलेली पत्रं वाचून दाखवतात. यूपीए सरकारच्या काळात सरकारी बँका यूपीएच्या दबावाखाली होत्या, असा आरोप करतात. सध्याच्या पंतप्रधानांना पत्र लिहिल्यावर माध्यमं माझ्यावर टीका करतात. त्यामुळे एनडीए सरकारच्या काळात नेमकं काय बदललं, असा प्रश्न मला पडतो,' अशा शब्दांमध्ये माल्ल्यानं सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. 





किंगफिशर एअरलाईन्स वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र तरीही मला मदत करण्याऐवजी टीकाच करण्यात आली, असं माल्ल्यानं पुढील ट्विटमध्ये म्हटलं. 'किंगफिशर एअरलाईन्स वाचवण्यासाठी मी 4 हजार कोटी कंपनीत गुंतवले. मात्र त्याची कोणीही दखल घेतली नाही. उलट माझ्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. देशातील सर्वोत्तम विमान कंपनीला (किंगफिशर एअरलाईन्सला) सरकारी बँकांनी मदत केली नाही. हा एनडीए सरकारचा दुटप्पीपणा आहे,' असा आरोप माल्ल्यानं केला. 




बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास मी तयार होतो, याची आठवण करुन देण्याचा प्रयत्नदेखील माल्ल्यानं केला. 'मी कर्नाटक उच्च न्यायालयाला माझ्या संपत्तीचा, मालमत्तेचा तपशील दिला होता, याची पुन्हा एकदा आठवण करुन द्यावीशी वाटते. बँका आणि देणेकऱ्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मी हे पाऊल उचललं होतं. मग बँकांनी मी देत असलेली रक्कम का घेतली नाही?', असा प्रश्न माल्ल्यानं विचारला आहे.  

Web Title: Double standards under NDA vijay mallya alleges says jet airways getting all help from public sector banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.