राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:47 IST2025-04-26T05:46:15+5:302025-04-26T05:47:30+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बेजबाबदार विधाने करून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची थट्टा करू नका

राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
नवी दिल्ली - अकोला जिल्ह्यात १७ नोव्हेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेतील सभेत स्वा. सावरकर यांच्याविषयी बेजबाबदार विधान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फटकारले. मात्र त्यांच्या विरोधातील फौजदारी कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली. स्वातंत्र्यसैनिकांची थट्टा करू नका असे न्या. दीपांकर दत्ता व न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने राहुल यांना सुनावले. वकील अभिषेक सिंघवी म्हणाले की, समाजात तेढ निर्माण करण्याचा गुन्हा राहुल यांनी केला नाही.
देशाचा इतिहास माहीत नसेल तर नको ते बोलता कशाला?
सर्वोच्च न्यायालयानेराहुल गांधी यांना सुनावले आहे की, तुम्ही स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करू नका, देशाच्या इतिहासाची माहिती नसेल तर बेजबाबदार विधाने करू नका. राहुल गांधी हे एका राजकीय पक्षाचे नेते असून, त्यांनी अशी टीका करणे योग्य आहे का? महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुजले जाते. ते लक्षात घ्या व नको ती विधाने करू नका हे नीट ध्यानात ठेवा. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक विधानांबद्दल खटला दाखल करणारे वकील नृपेंद्र पांडे, उत्तर प्रदेश सरकार यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. राहुल गांधी यांच्या विरोधातील खटला रद्द करण्यास नकार देण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला.
‘...तर आम्ही स्वत:हून दखल घेऊ’
यापुढे जर त्यांनी बेजबाबदार विधाने केली तर आम्ही त्याची स्वत:हून दखल घेऊ असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्याविषयी एखादी व्यक्ती अशी बेजबाबदार विधाने कशी करू शकते, असा संतप्त सवालही न्या. दीपांकर दत्ता यांनी केला.
आजीने सावरकरांचा गौरव केला हे माहीत आहे का? : न्या. दत्ता यांनी सवाल केला की, राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी सावरकर यांचा गौरव करणारे पत्र संबंधितांना पाठविले होते हे त्यांच्या नातवाला माहिती आहे का?