DK Shivakumar RSS Anthem: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी गुरुवारी (२१ ऑगस्ट) अचानक विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रार्थना गीत गायला सुरुवात केली. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना डीके शिवकुमार यांनी RSS चे प्रार्थना गीत 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमी...' च्या काही ओळी गायल्या. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन संघाचे कौतुक केले, तेव्हापासून काँग्रेस नेते पंतप्रधानांवर टीका करत आहेत. या विरोध करणाऱ्यांमध्ये डीके शिवकुमार आघाडीवर होते. मात्र, आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना संघाची प्रार्थना गात असल्याचे दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
डीके शिवकुमार आरएसएसशी संबंधित चिन्नास्वामी स्टेडियममधील चेंगराचेंगरीची सभागृहात चर्चा सुरू होती. यावेळी डीके शिवकुमार यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलण्यास सुरुवात केली. या दरम्यान, सभागृहातील विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी त्यांना आठवण करून दिली की, ते एकेकाळी आरएसएसशी संबंधित होते. हे स्वीकारत शिवकुमार म्हणाले की, मला अजूनही संघाची प्रार्थना आठवते. त्यानंतर त्यांनी प्रार्थना गायला सुरुवात केली. डीके शिवकुमार संघ प्रार्थना गात होते, तेव्हा भाजप आमदार आनंदाने टेबलावर हात मारू लागले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी विविध अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. काही लोक म्हणत आहेत की, हा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश आहे की, जर त्यांचे ऐकले नाही, तर त्यांच्यासाठी परतीचा मार्ग अजूनही खुला आहे. आणखी एका युजरने म्हटले, हा सिद्धरामय्या यांना थेट इशारा आहे. त्यांना असे म्हणायचे आहे की, जर तुम्ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडली नाही, तर शिवकुमार भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत.