२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:24 IST2026-01-08T19:24:21+5:302026-01-08T19:24:55+5:30
२०२१ च्या निवडणुकीत डिएमकेने १३३ तर एआयडिएमकेला ६६ जागा मिळाल्या होत्या. भाजपा केवळ ४ जागांवर विजयी झाली होती.

२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
चेन्नई - भाजपानं मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. २०२६ वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडू दौरा केला. त्यात भाजपा आणि एआयडिएमके दोन्ही पक्षात युती, जागावाटप आणि सत्ता फॉर्म्युल्याची चर्चा झाली. बुधवारी रात्री एआयडिएमकेचे महासचिव माजी मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीस्वामी यांनी अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीत अमित शाह यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. भाजपाला राज्यात एकूण २३४ जागांपैकी ५६ जागा हव्या आहेत. त्याशिवाय राज्यात सरकार बनल्यानंतर ३ मंत्रिपदांची मागणीही शाह यांनी केली आहे. या ५६ जागांमध्येच भाजपा त्यांच्या सहकारी मित्रांनाही सामावून घेईल. ज्यात एआयडिएमकेचे बंडखोर नेते ओ पन्नीरसेल्वम आणि टी.टी.वी दिनाकरन यांच्या नेतृत्वातील गट सहभागी आहे. त्याशिवाय तामिळनाडूत भाजपाचे काही छोटे सहकारीही आहेत. पुथिया तमिलगमसारखे पक्ष हे एनडीएचा भाग आहेत.
२०२१ च्या निवडणुकीत डिएमकेने १३३ तर एआयडिएमकेला ६६ जागा मिळाल्या होत्या. भाजपा केवळ ४ जागांवर विजयी झाली होती. एनडीएत सहभागी असणाऱ्या पीएमकेला ५ जागा मिळाल्या होत्या. डिएमकेचा सहकारी पक्ष काँग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या. एआयडिएमके पक्षातील सूत्रांनुसार, माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी बैठकीत भाजपाला कुठलेही आश्वासन दिले नाही. पक्षात याबाबत सल्लामसलत करावी लागेल असं त्यांनी शाहा यांना म्हटलं.
दरम्यान, निवडणुकीच्या दृष्टीने अशाप्रकारे जागांचे संकेत देणे हे हानिकारक ठरू शकते, कारण राज्यातील जनता ते स्वीकारणार नाही. यामुळे अण्णा द्रमुकच्या विजयाचा अर्थ तामिळनाडूमध्ये भाजपाचे राज्य येईल असा विरोधकांचा दावा बळकट होईल असं एआयडिएमकेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. दिवंगत अभिनेते-राजकारणी विजयकांत यांची डीएमडीके पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात अशा चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने एआयडिएमकेला ही ऑफर दिली आहे. ९ जानेवारी रोजी होणारी डीएमडीकेची बैठक ही घोषणा करण्यासाठी योग्य वेळ मानली जात आहे.