"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 12:10 IST2025-09-13T12:09:37+5:302025-09-13T12:10:21+5:30
महिंद्राच्या शोरूममध्ये थार खरेदी केल्यानंतर लगेचच दुर्घटना झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. थार शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून थेट फुटपाथवर पडली.

फोटो - ndtv.in
दिल्लीतील निर्माण विहार येथील महिंद्राच्या शोरूममध्ये थार खरेदी केल्यानंतर लगेचच दुर्घटना झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. थार शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून थेट फुटपाथवर पडली. असं सांगण्यात आलं की थार खरेदी केल्यानंतर, शुभशकुन म्हणून चाकाखाली एक लिंबू ठेवण्यात आला होता, थारच्या मालकाला त्याच्या पत्नीने हा विधी पूर्ण करावा अशी इच्छा होती. पण नंतर चुकून महिलेने अॅक्सिलरेटर दाबला आणि थार पहिल्या मजल्यावरील काचेची भिंत तोडून खाली पडली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. आता ज्या महिलेसोबत ही घटना घडली ती महिला समोर आली आहे. त्या महिलेने त्या दिवशी नेमकं काय घडलं ते सांगितलं. तसेच तिने दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या दाव्यांवरही नाराजी व्यक्त केली आहे. महिलेने सांगितलं की, त्यावेळी ती, तिचा पती आणि शोरूमचा एक सेल्समन कारमध्ये होतो. आम्ही तिघेही पूर्णपणे सुखरूप आहोत, आम्हाला कोणतीही दुखापत झालेली नाही. काही ठिकाणी गंभीर दुखापत आणि मृत्यू झाल्याचं वृत्त महिलेने चुकीचं असल्याचं सांगितलं.
थारमध्ये अडकलेल्या जोडप्याला वाचवण्यासाठी आलेल्या स्थानिक लोकांनी आणि शोरूमच्या कर्मचाऱ्याने सांगितलं की, थारचे स्टीअरिंग व्हील धरलेल्या महिलेने चाकांनी लिंबू चिरडण्याचा विधी करत असताना अॅक्सिलरेटर खूप जोरात दाबला, ज्यामुळे कार शोरूमच्या काचेच्या भिंतीला धडकली आणि ती तुटली आणि सुमारे १५ फूट खाली फूटपाथवर पडली.
महिलेने सोशल मीडियावर पसरलेल्या खोट्या माहितीवर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाली की, कृपया चुकीची माहिती पसरवू नका. या घटनेबाबत पोलीस उपायुक्त (पूर्व) अभिषेक धानिया म्हणाले की, घटनेची माहिती संध्याकाळी ६:०८ वाजता मिळाली. मात्र कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.