दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला; ८ संशयितांना अटक, पाकिस्तान-बांगलादेशशी कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 10:21 IST2026-02-22T10:19:44+5:302026-02-22T10:21:14+5:30
एक मोठा दहशतवादी कट उघडकीस आला असून पोलिसांनी भीषण हल्ल्याचा कट रचणाऱ्या ८ संशयितांना अटक केली आहे.

फोटो - आजतक
देशाची राजधानी दिल्लीमध्येदहशतवादी हल्ल्याचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान एक मोठा दहशतवादी कट उघडकीस आला असून पोलिसांनी भीषण हल्ल्याचा कट रचणाऱ्या ८ संशयितांना अटक केली आहे. हे आरोपी पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'ISI' आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटनांच्या इशाऱ्यावर काम करत होते.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राबवलेल्या एका मोहिमेतंर्गत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून या ८ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आता या आरोपींना दिल्लीत घेऊन येत आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून ८ मोबाईल फोन आणि १६ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. मिजानुर रहमान, मोहम्मद शबत, उमर, मोहम्मद लितान, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी बनावट आधार कार्ड वापरत होते. पोलिसांनी पश्चिम बंगालमधूनही २ आरोपींना अटक केली असून, त्यापैकी एक बांगलादेशी नागरिक आहे. या दहशतवादी मॉड्यूलने ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या विविध भागांत आणि मेट्रोमध्ये भडकाऊ पोस्टर्स लावले होते, ज्यामध्ये काश्मीरशी संबंधित वादग्रस्त मजकूर आणि 'FREE KASHMIR' सारख्या घोषणा लिहिल्या होत्या.
Six suspects arrested from Tamil Nadu for planning a major terrorist plot with the support of Pakistan's intelligence agency, ISI, and Bangladeshi terrorist organisations. Delhi Police are bringing all the suspects from Tamil Nadu to Delhi. A Bangladeshi citizen is among the…
— ANI (@ANI) February 22, 2026
जेव्हा दिल्ली पोलिसांनी या पोस्टर्सचा तपास सुरू केला, तेव्हा या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना तामिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यातील उथुकुली (२), पल्लडम (३) आणि तिरुमुरुगनपूंडी (१) येथील गारमेंट युनिट्समधून अटक केली.
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा' दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा त्यांचा डाव होता. गुप्तचर यंत्रणांच्या मते, लष्कर-ए-तोयबा भारताच्या मोठ्या शहरांमध्ये IED स्फोट घडवून आणण्याचा कट रचत आहे.
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या दिल्लीतील लाल किल्ला आणि चांदनी चौक परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. गर्दीच्या ठिकाणांवर विशेष निगराणी ठेवली जात आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचं आणि कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे निर्देश दिले आहेत.