Delhi Pollution parents wants smog break in schools every year | Delhi Pollution : विद्यार्थ्यांना हवा 'स्मॉग ब्रेक'; पालकांची मागणी 
Delhi Pollution : विद्यार्थ्यांना हवा 'स्मॉग ब्रेक'; पालकांची मागणी 

ठळक मुद्देशाळकरी मुलांना आता उन्हाळी सुट्ट्यांप्रमाणे 'स्मॉग ब्रेक' देण्याची गरज असल्याचं मत पालकांनी व्यक्त केलं आहे. एका सर्व्हेक्षणात जवळपास 70 टक्के पालकांनी स्मॉग ब्रेक हवा असल्याचं मत नोंदवलं आहे.74 टक्के पालकांनी 1 ते 20 नोव्हेंबर पर्यंत शाळांनी विद्यार्थ्यांना 'स्मॉग ब्रेक' देण्याची गरज व्यक्त केली.

नवी दिल्ली - दिल्लीमध्येप्रदूषणाने पातळी ओलांडली आहे. शाळकरी मुलांना आता उन्हाळी सुट्ट्यांप्रमाणे 'स्मॉग ब्रेक' देण्याची गरज असल्याचं मत पालकांनी व्यक्त केलं आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात जवळपास 70 टक्के पालकांनी 'स्मॉग ब्रेक' हवा असल्याचं मत नोंदवलं आहे. 'लोकल सर्कल्स' तर्फे करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणात दिल्ली, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा आणि गुरुग्राममधील 10 हजार पालकांनी सहभाग घेतला होता. यातील जवळपास 74 टक्के पालकांनी 1 ते 20 नोव्हेंबर पर्यंत शाळांनी विद्यार्थ्यांना 'स्मॉग ब्रेक' देण्याची गरज व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा काही दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्या सोमवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. 

दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी दिली. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) 20 राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले. दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. मात्र आता या नियमाच्या कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. गरज भासल्यास आणखी काही दिवस सम-विषम नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

दिल्लीच्या वातावरणात  शेजारच्या राज्यांमध्ये पेंड्या जाळल्यामुळे प्रदूषणात 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदूषित हवेचा पट्टा निर्माण झाला आहे. तीन महिन्यांनंतर दिल्लीतील हवेच्या प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. पंजाब, हरयाणातील पराली जाळली जात असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी 10 सदस्यीय समितीने कृती आराखडा तयार केला आहे. राजधानीतील हवा काही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेच्या त्रास नागरिकांना बसू नये यासाठी दिल्लीकरांना मास्क वाटण्यात आले आहेत.
 

Web Title: Delhi Pollution parents wants smog break in schools every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.