“ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची वेळ मुद्दाम निवडली, दिल्ली आंदोलन हा कटच”; पोलिसांचा SCत दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:25 IST2025-11-20T16:25:21+5:302025-11-20T16:25:21+5:30
Delhi Police In Supreme Court: हा योगायोग नव्हता, तर एक सुनियोजित कट होता, असा युक्तिवाद दिल्ली पोलिसांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.

“ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची वेळ मुद्दाम निवडली, दिल्ली आंदोलन हा कटच”; पोलिसांचा SCत दावा
Delhi Police In Supreme Court: दिल्ली आंदोलन प्रकरणातील शरजील इमाम यांच्यासह सहा आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दिल्लीपोलिसांनी याचिकेला विरोध केला. पोलिसांनी या सुनावणीवेळी न्यायालयात अनेक पुरावे सादर केले. सर्वोच्च न्यायालयात दिल्ली पोलिसांची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी न्यायालयासमोर एक व्हिडिओ क्लिप सादर केली. नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) मंजूर झाले, त्यावेळी संपूर्ण आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते, असा युक्तिवाद करण्यात आला.
आरोपींना मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळण्याची संधी दिसत होती. दिल्लीतील सामान्य आंदोलनासारखा हा प्रकार नव्हता. आरोपी दिल्लीतील व्यवस्था खंडित करू इच्छित होते. त्यांना दिल्ली आणि भारताच्या ईशान्येकडील आसाम प्रदेश आर्थिकदृष्ट्या कमकुवत करायचा होता. या आंदोलनाचा उद्देश लोकांना आवश्यक वस्तूंपासून वंचित ठेवणे हा होता, असा युक्तिवाद एसव्ही राजू यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केला.
हा योगायोग नव्हता, तर एक सुनियोजित कट होता
ते चिकन नेकचा संदर्भ देत होते, जो आसामला भारताशी जोडणारा १६ किलोमीटरचा भूभाग आहे. आरोपी काश्मीरबद्दल बोलत होते, मुस्लीम समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत होते. ते नंतर तिहेरी तलाकबद्दल बोलत होते आणि न्यायालयाची बदनामी करत होते, असा दावा यावेळी राजू यांनी केला. दिल्लीतील ते आंदोलन सत्तापालटाच्या उद्देशाने नियोजित कट होता. म्हणूनच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीची वेळ जुळवून आणली. हा योगायोग नव्हता, तर एक सुनियोजित कट होता, असा युक्तिवाद दिल्ली पोलिसांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.
दरम्यान, या कटातील मुख्य सदस्याने काय म्हटले होते की, तो असे म्हणत नाही की हे साधे आंदोलन आहे. तर तो असे म्हणतो की, हे एक हिंसक विरोध आहे, जो आसामला भारतापासून वेगळे करण्यासाठी होता, असाही युक्तिवाद करण्यात आला.