टॉवेल सुटला अन् चोर सापडला; धम्माल थरार सीसीटीव्हीने टिपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 12:27 IST2018-05-22T12:27:05+5:302018-05-22T12:27:05+5:30
दिल्लीत पोलिसांनी एका चोराला अजब स्थितीत पकडलं

टॉवेल सुटला अन् चोर सापडला; धम्माल थरार सीसीटीव्हीने टिपला
नवी दिल्ली: पोलिसांकडून चोरांचा केला जाणारा पाठलाग काही नवा नाही. मात्र दिल्लीत पोलिसांनी एका चोराला अजब स्थितीत पकडलं आहे. पोलिसांनी पाहताच नेहमीच चोर पळू लागतात. तसंच इथंही घडलं. पोलिसांना चकवण्यासाठी चोरानं थेट दुसऱ्या मजल्यावरुन उडीदेखील मारली. मात्र तितक्यात त्यानं कमरेभोवती गुंडाळलेलं टॉवेल सुटलं आणि चोर पोलिसांच्या हाती लागला.
पश्चिम दिल्लीच्या इंद्रपुरीमध्ये पोलिसांनी चोराला अटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानं पोलिसांवर टीका होत होती. पोलिसांनी आरोपीला निर्वस्त्र करुन त्याला बाजारात पळवलं, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. यावर दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी दीपेंद्र पाठक यांनी स्पष्टीकरण दिलं. 'पोलीस चोराला पकडण्यासाठी गेले असता, त्यानं तिथून पळ काढला. दुसऱ्या मजल्यावर उडी मारताना त्याचं टॉवेल सुटलं. त्याही परिस्थितीत तो पळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं,' असं पाठक यांनी सांगितलं.
निर्वस्त्र अवस्थेत धावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडलं आणि त्याला पोलिसांच्या गाडीत नेलं. त्यानंतर त्याला कपडे देण्यात आले. अटक करण्यात आलेला अतिशय कुख्यात असून त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटदेखील जारी करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव विरेंद्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. त्यावेळी तो बाथरुममध्ये जाऊन लपला. यानंतर तो तिथूनही बाहेर पडला आणि त्यानं दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. मात्र त्याचं टॉवेल सुटलं आणि तो निर्वस्त्र झाला. त्यामुळे चोर फार वेळ पळू शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.