"भगत सिंगांनी काँग्रेस सरकारवर बॉम्ब टाकला"; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा, ऐतिहासिक चुकीमुळे भाजपची नाचक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 10:25 IST2026-01-08T10:20:26+5:302026-01-08T10:25:29+5:30
मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या विधानानंतर सौरभ भारद्वाज यांनी शहीद भगत सिंगांची माफी मागितली.

"भगत सिंगांनी काँग्रेस सरकारवर बॉम्ब टाकला"; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा, ऐतिहासिक चुकीमुळे भाजपची नाचक्की
Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विधानसभा अधिवेशनात केलेल्या एका विधानामुळे सध्या देशभर चर्चा आणि टीकेची झोड उठली आहे. "शहीद भगतसिंग यांनी ऐकू न येणाऱ्या काँग्रेस सरकारला जागं करण्यासाठी बॉम्ब फेकला होता," असा अजब दावा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केला. वास्तवात भगतसिंगांनी १९२९ मध्ये ब्रिटीश राजवटीच्या विरोधात सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला होता. मुख्यमंत्र्यांच्या या ऐतिहासिक चुकीमुळे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या इतिहासाचा संदर्भ दिला. महाभारत आणि पृथ्वीराज चौहान यांचा उल्लेख करत असताना त्यांनी १९२९ च्या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख केला. "दिल्लीने भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची क्रांती पाहिली आहे, जेव्हा त्यांनी बहिऱ्या काँग्रेस सरकारविरुद्ध बॉम्ब फेकला होता." त्यांच्या या विधानानंतर सभागृहात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.
सौरभ भारद्वाज यांनी हात जोडून मागितली माफी
आपचे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सडकून टीका केली. भारद्वाज यांनी शहीद भगतसिंग यांच्या फोटोसमोर हात जोडून उभे असलेला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. "शहीद आझम, आम्हाला माफ करा. दिल्लीत भाजपची अशी मुख्यमंत्री आली आहे, जिला हे देखील माहित नाही की तुम्ही ब्रिटीशांविरुद्ध लढलात. त्यांना वाटतंय की तुम्ही स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस सरकारवर बॉम्ब टाकला होता," असं भारद्वाज म्हणाले. शाळकरी मुलांनाही माहित असलेला इतिहास राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहित नसावा, हे दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.
इतिहासाचे रीमिक्स व्हर्जन
"हे इतिहासाचा अपडेटेड व्हर्जन आहे. पुढच्या वेळी कदाचित असंही ऐकायला मिळेल की चंद्रगुप्त मौर्याने गांधीजींच्या सांगण्यावरून साम्राज्य विस्तार केला होता, असा टोला आपचे खासदार संजीव झा यांनी लगावला. तर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी "भाजपचे नेते आता भगतसिंगांकडून काँग्रेस सरकारवर बॉम्ब फेकून घेत आहेत. हे इतिहासाचे विद्रुपीकरण आहे," असं म्हटलं.
दरम्यान, या विधानावरून प्रश्न विचारणाऱ्या आप आमदारांना विधानसभेत येण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संजीव झा, कुलदीप कुमार आणि जरनैल सिंह या आमदारांना दिल्ली पोलिसांनी विधानसभेच्या प्रवेशद्वारावरच अडवले. राज्यपालांच्या भाषणात अडथळा आणल्याच्या कारणावरून या आमदारांना निलंबित करण्यात आले होते.