Delhi Blast: बॉम्बस्फोटाआधी तरुणांना भडकावण्यासाठी डॉ. उमरने ७० व्हिडिओ चित्रीत केल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:54 IST2025-11-20T16:52:07+5:302025-11-20T16:54:34+5:30
Delhi Car Bomb Blast: दिल्ली कार बॉम्बस्फोटात स्वतःला उडवून देणारा अतिरेकी डॉ. उमरने ११ तरुणांचा ब्रेनवॉश करण्यासाठी ७० व्हिडीओ बनवल्याची माहिती समोर आली.

Delhi Blast: बॉम्बस्फोटाआधी तरुणांना भडकावण्यासाठी डॉ. उमरने ७० व्हिडिओ चित्रीत केल्याचे उघड
नवी दिल्ली: दिल्ली कार बॉम्बस्फोटात स्वतःला उडवून देणारा अतिरेकी डॉ. उमर हा हल्ल्याच्या दोन आठवडे आधी पुलवामातील कोईल गावात त्याच्या घरी गेला होता. त्याने ११ तरुणांचा ब्रेनवॉश करण्यासाठी ७० व्हिडीओ बनवले होते व त्यापैकी १२ त्याने स्वतः शूट केले होते, अशी माहिती पुढे आली आहे.
दिल्लीत आत्मघाती हल्ला घडवून आणण्यापूर्वी काही दिवस तो नूहमध्ये एका खोलीत राहिला होता. त्याने कपडेही बदलले नाहीत किंवा आंघोळही केली नाही. तो रात्रीच्या वेळी जेवायला बाहेर जात असे. तो ज्या घरात राहिला होता त्या घराची मालकीण अफसाना आणि शोएब यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले असून, दोघांकडून माहिती घेतली जात आहे. अफसानाचा पती ड्रायव्हर आहे.
डॉ. उमरच्या हालचाली तपासण्यासाठी तपास यंत्रणा नूहमध्ये पोहोचली तेव्हा ती घाबरून पळून गेली होती. परंतु १७ नोव्हेंबर रोजी कुटुंबाने तिला तपास यंत्रणांच्या ताब्यात दिले. ३१ ऑक्टोबरपासून डॉ. उमर त्या खोलीत राहिला होता. त्याचे वागणे संशयास्पद वाटल्यामुळे तिने त्याच्याशी संपर्क साधणे बंद केले होते, अशी माहिती तिने दिली आहे. उमरने अफसानाचा फोन वापरला. ती अंगणवाडी सेविका आहे. तिचा एक फोन डॉ. उमरने वापरला. डॉ. उमरने केलेल्या बूट बॉम्ब स्फोटामुळे दिल्लीत १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.
जवाद सिद्दिकी १३ दिवसांच्या ईडी कोठडीत
दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी सकाळी जवाद अहमद सिद्दिकी याला १३ दिवसांसाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी) कोठडीत पाठवले.
दहशतवादाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिद्दिकी याला मध्यरात्रीच्या सुमारास अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर त्यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले.
अल फलाह ग्रुपने विद्यार्थ्यांकडून उकळले ४१५ कोटी रुपये
अल फलाह ग्रुपचा अध्यक्ष जवाद अहमद सिद्दिकी भारत सोडून जाण्याची अनेक कारणे आहेत; कारण त्याचे जवळचे कुटुंब आखाती देशांमध्ये स्थायिक - आहे. त्याच्या ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून ४१५ कोटी रुपये उकळले आहेत, असे (ईडी) न्यायालयाला सांगितले. फरिदाबादस्थित अल फलाह युनिव्हर्सिटी ग्रुपवर दिवसभर छापा 3 टाकल्यानंतर मंगळवारी रात्री सिद्दिकी याला ईडीने ताब्यात घेतले. ईडीने न्यायालयाला सांगितले की, सिद्दिकीच्या निर्देशावरून विद्यापीठ आणि त्याच्या नियंत्रणाखालील ट्रस्टने खोट्या मान्यता, मान्यता दाव्यांच्या आधारे विद्यार्थी आणि - पालकांची फसवणूक करून पैसे देण्यास भाग पाडले व ४१५.१० कोटी रुपये उकळले. सिद्दिकीची अटक आवश्यक होती, तो फरार होण्याची शक्यता होती.
मिळवला मोठा महसूल
अल फलाह विद्यापीठाने २०१८-२०२५ आर्थिक वर्षात ४१५.१० कोटी रुपयांचा शैक्षणिक महसूल मिळवला. यामध्ये २०१८ नंतर दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. विद्यापीठाने २०१८-२०१९ मध्ये २४.२१ कोटी महसूल मिळवला, जो २०२४-२०२५ मध्ये ८०.१० कोटी रुपये झाला.
संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण
ईडीने म्हटले आहे की, सिद्दिकी हा संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आहे. तो अल फलाह चॅरिटेबल ट्रस्ट नियंत्रित करतो. आयकर रिटर्न डेटामध्ये अद्याप प्रतिबिंबित न झालेले उत्पन्न यासह गुन्ह्यातील उत्पन्न शोधण्यासाठी सिद्दिकी याची कोठडी चौकशी आवश्यक आहे.