Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:53 IST2025-11-26T11:50:41+5:302025-11-26T11:53:01+5:30
Delhi Blast Case: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये एनआयएने आणखी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सात झाली आहे.

Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दहशतवादी डॉक्टर उमर उन नबी याने आत्मघाती स्फोट केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना एनआयए अशा व्यक्तीपर्यंत पोहोचली, ज्याने उमरला आश्रय दिला होता. मदत केली होती. एनआयएने फरिदाबादमधून शोएब नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणात ही सातवी अटक करण्यात आली आहे.
एनआयएच्या तपासातून असे समोर आले की, दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आधी शोएबने दहशतवादी उमरला मदत केली होती. शोएब फरिबादमधील धौज गावचाच रहिवाशी आहे. तो अल फलाह विद्यापीठात वॉर्ड म्हणून काम करायचा. उमरला सामान आणण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी त्याने मदत केल्याचा आरोप आहे.
मेहुणीचे घर भाड्याने मिळवून दिले
समोर आलेल्या माहितीनुसार, शोएबनेच नूंहमध्ये उमर नबीला त्याची मेहुणी अफसाना हिचे घर भाड्याने मिळवून दिले होते. १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत स्फोट होण्यापूर्वीपर्यंत उमर याच घरात राहत होता. ज्या दिवशी दिल्लीत बॉम्बस्फोट झाला, त्यादिवशी उमर याच घरातून दिल्लीसाठी रवाना झाला होता.
सध्या एनआयए छापेमारी करत असून अनेक संशयित आणि इतर लोकांची चौकशी करत आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यात हा तपास सुरू आहे.
दिल्ली स्फोट प्रकरणात अटक केलेले आरोपी कोण?
आमिर राशिद अली, पुलवामातील पंपोरचा रहिवाशी
जासिर बिलाल वाणी, अनंतनाग
डॉ. मुजम्मिल शकील, पुलवामा
डॉ. अदिल अहमद, अनंतनाग
डॉ. शाहीन सईद, लखनौ
मुफ्ती इरफान अहमद, शोपिया
शोएब, फरिदाबादमधील धौज