Delhi Assembly Election 2025: भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी त्यांच्या एका वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्याला लक्ष्य करून केलेल्या वक्तव्याबद्दल जनता दलाने गुरुवारी मित्रपक्ष भाजपकडून त्यांचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या वक्तव्यांमुळे पूर्वांचली समुदायात मोठी नाराजी पसरली असल्याचे जेडीयूने म्हटले होतं. त्यानंतर पूनावाला यांनी एक व्हिडीओ जारी करत हात जोडून माफी मागितली आहे. मला कुठलेही स्पष्टीकरण द्यायचे नाही म्हणत पूनावाला यांनी माफी मागितली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या चर्चेदरम्यान, आम आदमी पक्षाने शेहजाद पूनावाला यांच्यावर टीव्ही डिबेटमध्ये आक्षेपार्ह गोष्टी बोलल्याचा आरोप केला होता. या वादात शेहजाद यांनी आपचे ऋतुराज झा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. शेहजाद यांनी ऋतुराज यांच्या आडनावावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी शेहजाद यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली. शेहजाद पूनावाला यांच्या वक्तव्याबाबत आप खासदार संजय सिंह यांनी भाजपने पूर्वांचलवासियांचा फक्त वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच जनता दलानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. "मी माझ्या सर्व पूर्वांचली बंधू आणि भगिनींची हात जोडून माफी मागू इच्छितो. माझ्या शब्दामुळे दुखावले गेले आहे. मला कोणतेही स्पष्टीकरण द्यायचे नाही. माझे तुझ्याशी घट्ट नाते आहे. हे प्रेम, आपुलकी आणि आदराचे नाते आहे. मी उत्तर प्रदेश-बिहारच्या लोकांचा, विशेषत: कष्टकरी लोकांचा आदर करतो. हे माझ्या चारित्र्य आणि जीवनातून स्पष्ट होते. तरीही माझ्या शब्दांमुळे जी दुखापत झाली आहे त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो, असं शेहजाद पूनावाला यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
एका टीव्ही डिबेट शोदरम्यान शहजाद पूनावाला आणि ऋतुराज झा यांच्यात जोरदार वाद झाला होता. ऋतुराज झा यांनी पहिल्यांदा शेहजाद यांना दोनदा 'चुनवाला' म्हणून संबोधले. यानंतर संतप्त झालेल्या पूनावाला यांनी ऋतुराज झा यांच्या आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर आम आदमी पक्षाने हा पूर्वांचलच्या जनतेचा अपमान असल्याचे सांगून भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. दिल्ली निवडणुकीत भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता होती.
भाजप खासदार आणि पूर्वांचली समाजाचे ज्येष्ठ नेते मनोज तिवारी यांनी उघडपणे शेहजाद पूनावाला यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना माफी मागण्यास सांगितले होते. विरोधक आणि मित्रपक्षांनीही भाजपला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. जेडीयूनेही पूनावाला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या वक्तव्यावर पूर्वांचलची जनता संतापली असल्याचे जेडीयूने म्हटले. मात्र यानंतर पूनावाला यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे.