महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इंडिया आघाडीमधील आप आणि काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्याने दिल्लीत यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील सत्ताधारी आप, मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, दिल्लीमधील नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाकडून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. आता भाजपानेही येथून तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपाने येथून प्रवेश वर्मा यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.
प्रवेश वर्मा यांनी निवडणूक लढवण्याबाबत सांगितले की, काँग्रेसने नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून संदीप दीक्षित यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपाने मला या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. आमची उमेदवारी यादी अद्याप प्रसिद्ध व्हायची आहे. मी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणूक लढवेन.
प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना सांगितले की, अरविंद केजरीवाल हे स्वत:ला आम आदमी म्हणवून घेतात. मात्र ते आम आदमी नाही तर खास आदमी आहेत. ते शीशमहलात राहतात. त्यांनी दिल्लीच्या जनतेसाठी काहीही केलेलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रवेश वर्मा हे दिल्लीतील पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम पाहिले होते. मात्र यावेळी त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत.