भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 17:34 IST2025-08-09T17:32:50+5:302025-08-09T17:34:20+5:30
भारतीय जनता पक्षाच्या दोन खासदारांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्या प्रकरणामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
Nishikant Dubey News: भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवघरमधील स्थानिक पोलिसांनी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा नोंदवला. देवघर येथील वैद्यनाथ धाम मंदिराच्या गाभार्यात दोघांनीही जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देवघर येथील पंडा धर्मरक्षिणी सभेचे माजी महामंत्री कार्तिकनाथ ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी झारखंडमधील गोंडाचे खासदार निशिकांत दुबे आणि दिल्लीतील खासदार मनोज तिवारी यांच्याविरोधात एफआरआय नोंदवण्यात आला.
निशिकांत दुबे, मनोज तिवारींनी मंदिरात काय केलं?
कार्तिकनाथ ठाकूर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, श्रावण महिन्यानिमित्त मंदिरात व्हीव्हीआयपी दर्शन आणि गाभाऱ्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे. असा निर्णय झालेला असतानाही २ ऑगस्ट रोजी मनोज तिवारी, निशिकांत दुबे, त्यांचा मुलगा कनिष्ककांत दुबे, दोन्ही खासदारांचे पीए आणि देवघरमधील काही भाजप कार्यकर्ते नियम धुडकावून मंदिराच्या गाभाऱ्यात घुसले.
पोलिसांनाही धक्काबुक्की, जबरदस्ती घुसून पूजा
मंदिराच्या बाहेर पडायच्या दरवाज्यातही ड्युटीवर असलेल्या पोलिसांना त्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊ शकले असा गोंधळ उडाला होता. त्यादिवशी भाविकांसोबत वाईट घटना घडली असती. खासदारांनी मंदिरात जबरदस्ती प्रवेशच केला नाही, तर आतमध्ये जाऊन पूजाही केली. त्यामुळे मंदिरातील नियमित कामात अडथळा निर्माण झाला होता.
रात्री ८.४५ वाजता कांच जल पूजेच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला. पुरोहितांनी दोन्ही खासदारांना मंदिरात येण्यास मनाई केल्यानंतरही त्यांनी हे सगळं केलं. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. खासदार निशिकांत दुबे यांनी गोंधळ तयार होईल असे कृत्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.