Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:24 IST2025-10-06T12:24:13+5:302025-10-06T12:24:53+5:30
Cough Syrup : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे आतापर्यंत १९ मुलांचा मृत्यू झाला आहे.

फोटो - आजतक
कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मृत्यू होणाऱ्या लहान मुलांची संख्या वाढत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपमुळे आतापर्यंत ९ मुलांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील बैतुल येथील कलमेश्वरा गावातील रहिवासी कैलाश यादव यांचा मुलाचा ८ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. २४ ऑगस्ट रोजी सर्दी आणि खोकला झाल्यामुळे कैलाशने आपला ३ वर्षांचा मुलगा कबीर याला छिंदवाडाच्या पारसिया येथील बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांच्याकडे उपचारासाठी नेलं.
डॉक्टरांनी कोल्ड्रिफ सिरप आणि इतर औषधं लिहून दिली. ही औषधे वापरल्यानंतर, मुलाची प्रकृती आणखी बिघडली. त्यानंतर त्याच्यावर तीन रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु ८ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. कैलाश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलाला सर्दी आणि खोकला झाला होता. त्याला उपचारासाठी डॉ. प्रवीण सोनी यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी सुरुवातीला कोल्ड्रिफ सिरप लिहून दिलं.
कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
कोल्ड्रिफ सिरपमुळे झाला मृत्यू
कोल्ड्रिफ सिरप दिल्यानंतर, मुलाची प्रकृती जास्त बिघडली. त्याला दुसऱ्या क्लिनिकमध्ये पाठवण्यात आलं. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की मुलाची किडनी हळूहळू फेल होत आहे. त्यानंतर मुलावर चार रुग्णालयांमध्ये उपचार केले, परंतु त्याला वाचवता आलं नाही. त्याचा मृत्यू हा कोल्ड्रिफ सिरपमुळे झाला. कैलाश यादव डॉक्टर आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
चार लाख रुपयांचं कर्ज
"मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी माझी जमीन गहाण ठेवली होती. सरकारने मला त्याची भरपाई द्यावी. मी चार लाख रुपयांचं कर्ज घेण्यासाठी जमीन गहाण ठेवली होती आणि इतर स्रोतांकडून पन्नास हजार रुपये कर्ज घेतले होते. एकूण खर्च साडेचार लाख रुपये आहे. तो माझा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाला खूप धक्का बसला आहे. मी यापूर्वी माझ्या मुलाचा उपचार प्रवीण सोनी यांनी केले होते, परंतु यावेळी कोल्ड्रिफ सिरपमुळे त्याचा जीव गेला" असं कैलाश यादव यांनी म्हटलं आहे.