CoronaVirus News: ...म्हणून सर्वांना लस मिळेपर्यंत बराच वेळ लागणार; सीरमच्या पूनावालांनी सांगितली मोठी अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 22:21 IST2020-07-19T22:19:38+5:302020-07-19T22:21:37+5:30
CoronaVirus News: कोरोनावरील लस तयार करण्यासाठी जगभरात संशोधन सुरू

CoronaVirus News: ...म्हणून सर्वांना लस मिळेपर्यंत बराच वेळ लागणार; सीरमच्या पूनावालांनी सांगितली मोठी अडचण
मुंबई: देशासह जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या १० लाखांच्या, तर जगातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वा कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामुळे कोरोनावरील लस सापडणार का, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये ऑक्सफोर्ड-अस्ट्राझेनेकाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑक्सफोर्ड-अस्ट्राझेनेका सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीनं कोरोनावरील लस तयार करणार आहेत. त्यासाठी सीरमला डीजीसीआयनं परवानगी दिली आहे.
कोरोनावरील लसीची निर्मिती करण्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाला यश मिळण्याची शक्यता खूप मोठी आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या लसीची सध्या मानवी चाचणी सुरू आहे. ही लस दुहेरी ढाल म्हणून काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सफर्डनं निर्माण केलेली कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीज आणि टी सेल्स तयार करेल. लसीमुळे शरीरात गेलेल्या अँटीबॉडीज काही महिन्यांत नष्ट होतील. मात्र टी सेल्स काही वर्षे कायम राहतील, असं प्राथमिक चाचण्यांमधून दिसून आलं आहे.
ऑक्सफर्डनं कोरोनावरील लस शोधल्यास सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तिचं उत्पादन सुरू करण्यात येईल. मात्र ही लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत बराच कालावधी जाईल, असं सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. 'कोरोनावरील लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करावं लागेल. त्यातही परवाना मिळालेली पहिली लस सर्वोत्तम असेलच असं नाही', असं पूनावाला यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितलं.
कोरोनावरील लस तयार करताना, त्यावर संशोधन करताना विविध वैद्यकीय पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणती लस सर्वोत्तम आहे हे पाहण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असं पूनावाला म्हणाले. सध्या सीरमनं लसीचे किती डोस तयार केले आहेत याबद्दलच्या आकडेवारीवर भाष्य करणं त्यांनी टाळलं. परवाना मिळताच आम्ही पुढील ती तीन महिन्यांत लक्षावधी डोसेस तयार करू, असं पूनावाला यांनी सांगितलं.