CoronaVirus: Newspaper, fully secured, cleaned by the World Health Organization | CoronaVirus : वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित, जागतिक आरोग्य संघटनेचाही निर्वाळा

CoronaVirus : वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित, जागतिक आरोग्य संघटनेचाही निर्वाळा

वृत्तपत्रांना हात लावल्याने कोरोनाच्या विषाणूंची लागण होण्याचा धोका वाढतो, ही एक कसलाही आधार नसलेली अफवा आहे. काही मंडळी ही चुकीची माहिती पसरवीत आहेत. प्रत्यक्षात ज्या पद्धतीने वृत्तपत्रांची छपाई होते व ते ज्या पद्धतीने खबरदारी बाळगून आपल्या घरापर्यंत पोहोचविले जातात, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विषाणू पसरण्याचा कसलाही आणि कुठेही धोका नसतो, ही वस्तुस्थिती आहे. आता तर जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (डब्ल्यूएचओ) वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दुधाची पाकिटे, वृत्तपत्र किंवा नोटा या माध्यमांतून कोरोनाचा प्रसार होतो, असे म्हणणे पूर्णत: तथ्यहीन आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात बहुतेक वृत्तपत्रांची छपाई स्वयंचलित पद्धतीने होते. छपाईच्या या प्रक्रियेत वृत्तपत्राला हात लावण्याची कसलीही गरज पडत नाही. छपाईपासून तर मोजून बंडल बांधण्याची सारी प्रक्रिया यंत्रांच्या माध्यमातूनच होते.
एवढेच नाही तर, हे प्रिंटिंग युनिटदेखील पूर्णत: सॅनिटाईझ असते. छपाईच्या प्रक्रियेत मशीन सांभाळणारे कर्मचारीही कामाच्या पूर्वी आणि नंतर पूर्णत: संक्रमणमुक्त राहण्यासाठी सॅनिटायझर आणि हॅण्ड वॉशिंगसह सर्व प्रकारची खबरदारी घेतात. आता राहिला मुद्दा तो हॉकर्सच्या हातामधून वृत्तपत्रे संक्रमित होण्याचा. मात्र, त्यांच्यामध्ये एवढी जागरूकता निर्माण करण्यात आली आहे की, हा विषय तर आता केव्हाचाच संपला आहे. आमचे हॉकर्स वृत्तपत्र घेऊन निघण्यापूर्वी आपले हात आवर्जून सॅनिटाईझ करतात. जागतिक आरोग्य संघटनेने तर स्पष्ट म्हटले आहे की, एखाद्या संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेले पाकीटही संक्रमित होण्याची शक्यता फारच कमी असते. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह देशभरातील अनेक ख्यातनाम व्यक्तींनीही वृत्तपत्रांच्या माध्यमातून विषाणू पसरण्याची बाब पूर्णत: चुकीची ठरविली आहे.

प्रत्यक्ष संपर्कातून पसरतो विषाणू
भारतामध्ये आजवर कोरोनासारख्या आजाराशी संबंधित जी प्रकरणे पुढे आली त्यात प्रत्यक्ष संपर्कातूनच नागरिक बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, एका व्यक्तीच्या माध्यमातून दुसरा व्यक्ती संक्रमित झाला आहे. हे संक्रमण नातेवाईक, आपल्या अवतीभोवती वावरणारे मित्र किंवा ज्यांच्याशी बऱ्याच काळापासून प्रत्यक्ष थेट संपर्क होत आला असेल, अशांकडूनच होत असते. त्यामुळे वृत्तपत्र घरात घेताना निश्चिंत राहा. कारण यातून विषाणूंचा कसलाही धोका नाही. घरात नियमित स्वच्छता ठेवा. एकमेकांपासून लांब राहा. कोणतेही काम करण्यापूर्वी आपले हात २० सेकंदांपर्यंत साबण-पाण्याने स्वच्छ करा. विनाकारण तोंडाला, नाकाला, डोळ्याला स्पर्श करू नका. स्पर्श करायचाच असेल तर, त्यापूर्वी आपले हात सॅनिटाईझ करा. १४ एप्रिलपर्यंत आपापल्या घरातच थांबा, जेणेकरून कोरोनाच्या विषाणूची साखळी आम्हा सर्वांना तोडून नष्ट करता येईल. विश्वास ठेवा, या काळात वृत्तपत्रेच आपला सच्चा मित्र बनून राहतील.

वृत्तपत्र पोहचवितात खºया बातम्या
लॉकडाऊनच्या या काळात खºया बातम्या आपल्यापर्यंत पोहोचणे हे अत्यंत गरजेचे आहे. हे काम वृत्तपत्रेच प्रामाणिकपणे करतात. आपणास अद्ययावत ठेवतात. आपल्या जबाबदारीपासून वृत्तपत्रे कधीच हटलेली नाहीत, हटत नाहीत. कोणतीही बातमी प्रकाशित करण्यापूर्वी तिची सत्यता, वस्तुनिष्ठता पडताळली जाते. वृत्तपत्रे सनसनाटी निर्माण करीत नाहीत तर समाजाला जागृत करण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडतात. समाजमाध्यमांवरून (सोशल मीडिया) भ्रामक आणि खोट्या बातम्या कशा पसरविल्या जातात, हे आपण सारे जाणताच. अशा संभ्रमाच्या वातावरणात वृत्तपत्र हेच एक असे माध्यम आहे जे आपणापर्यंत खरी माहिती पोहोचविते. त्यामुळे वृत्तपत्र वाचत राहा आणि जागरूक नागरिक बना.

Web Title: CoronaVirus: Newspaper, fully secured, cleaned by the World Health Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.