CoronaVirus News: देशात दिवसभरात प्रथमच ७ हजार रुग्ण; नागरिकांत चिंतेचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:12 IST2020-05-30T00:46:37+5:302020-05-30T06:12:49+5:30
एकाच दिवसात सात हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे.

CoronaVirus News: देशात दिवसभरात प्रथमच ७ हजार रुग्ण; नागरिकांत चिंतेचे वातावरण
नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन लागू करून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला असून कोरोना साथीचा हाहाकार कमी होण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. गुरुवारी एका दिवसात कोरोनाचे ७,४६८ रुग्ण आढळून आल्याने या आजाराच्या एकूण रुग्णांची भारतातील संख्या १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे.
एकाच दिवसात सात हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची मुदत रविवारी, ३१ मेला संपत आहे. कोरोना साथीची स्थिती आटोक्यात येत नसल्याने लॉकडाऊनची मुदत पुन्हा वाढविण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
भारतातील कोरोना साथीचा फैलाव वाढतच चालला असून बळींची संख्याही ४७०० वर पोहोचली आहे. त्यातील चांगला भाग असा की, कोरोनाची लागण झालेले ७१ हजारांपेक्षा जास्त लोक उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या राज्यांमध्ये आहेत.
मुंबईसह १३ शहरांत ७० टक्के रुग्ण
कोरोनाच्या साथीचा सर्वात मोठा फटका देशातील १३ मोठी शहरे व ५ राज्यांना बसला आहे. त्यातील शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता/हावडा, इंदूर, जयपूर, जोधपूर, चांगलपट्टू, तिरूवल्लूर यांचा समावेश आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण या शहरांत आहेत.