CoronaVirus: कोरोना चाचण्या करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर;देशात उत्तर प्रदेशमधील परिस्थिती सर्वात वाईट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 06:10 IST2021-04-29T06:06:11+5:302021-04-29T06:10:02+5:30
मार्चच्या मध्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर जाणवू लागला. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला.

CoronaVirus: कोरोना चाचण्या करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर;देशात उत्तर प्रदेशमधील परिस्थिती सर्वात वाईट
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक तडाखा महाराष्ट्राला बसला असला तरी देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. सर्वाधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात वाईट परिस्थिती असून चाचण्यांचा वेग कमी असल्याचे उघड झाले आहे. रॅपिड अँटिजन टेस्ट आणि आरटी-पीसीआर या चाचण्यांचा स्वतंत्र डेटा शेअर करण्याचे काम केंद्राने थांबवले आहे.
मार्चच्या मध्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर जाणवू लागला. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. कोरोनाबाधितांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक होते. मात्र, अलीकडेच हे प्रमाण लक्षणीय प्रमाणात घटू लागले आहे. कोरोना चाचण्यांचा वाढवलेला वेग हे त्यामागील कारण आहे. १ एप्रिल रोजी राज्यात १ लाख ८० हजार लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या तर उत्तर प्रदेशात हेच प्रमाण १ लाख २० हजार एवढे होते. २७ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात २ लाख ८० हजार चाचण्या घेण्यात आल्या तर उत्तर प्रदेशात केवळ १ लाख ८० हजार जणांच्या चाचण्याच पूर्ण होऊ शकल्या. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी २० लाख आहे तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या २२ कोटी २० लाख एवढी आहे.
दिल्लीची कामगिरीही निराशाजनक
दिल्लीतही कोरोनाचा कहर असताना चाचण्यांच्या बाबतीत दिल्लीचा वेग कमीच आहे. १ एप्रिल रोजी दिल्लीत ७८ हजार चाचण्या केल्या होत्या. मात्र, २७ एप्रिल रोजी हा आकडा ७३ हजारांपर्यंत घसरला. २७ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ६३ लाख तर उत्तर प्रदेश आणि दिल्लीत अनुक्रमे ५२ लाख आणि २१ लाख चाचण्या करण्यात आल्या.
आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजन या दोन चाचण्यांचा स्वतंत्र डेटा राज्यांशी शेअर करण्याचे काम इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) का थांबवले, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.
१ एप्रिल ११ एप्रिल २७ एप्रिल २७ दिवसांत
महाराष्ट्र १,८०,००० २,६०,००० २,८०,००० ६३,००,०००
उत्तर प्रदेश १,२०,००० २,००,००० १,८०,००० ५२,००,०००
दिल्ली ७८,००० १,१०,००० ७३,००० २१,००,०००
देश ११,१०,००० ११,८०,००० १७,२०,००० ३,६७,००,०००