CoronaVirus India trying hard for corona vaccine | CoronaVirus News: कोरोनावरील लस मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न; जोरदार मोर्चेबांधणी

CoronaVirus News: कोरोनावरील लस मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न; जोरदार मोर्चेबांधणी

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवरील लशीच्या तिसºया टप्प्यातील चाचणीपर्यंत अनेक जागतिक कंपन्या पोहोचल्या असल्यामुळे ही लस मिळवण्यासाठी भारत युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

रशियन विद्यापीठाने पुढील आठवड्यात सुरवातीला या लशीची नोंदणी करण्याचे संकेत दिले असून व्यापक प्रमाणावर त्याचे उत्पादनही सुरू केले.
कोविड-१९ वरील लस प्राप्त करणे व तिच्याशी संबंधित व्यवस्थापनाच्या पंतप्रधान मोदी यांच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांची या लशीवर बारीक नजर आहे. ही लस आॅक्सफोर्ड, कॅनसिनो आणि फिझर यासारख्या जागतिक कंपन्यांकडून चाचणी घेतली जात आहे. या कंपन्या तिसºया टप्प्यातील चाचणीपर्यंत गेल्या आहेत. भारतीय लशीच्या चाचण्या या प्रारंभिक टप्प्यावर असल्यामुळे हा टास्क फोर्स जागतिक कंपन्यांकडून या लशी प्राप्त करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (हू) किमान १६५ लशी कोरोना विषाणूसाठी विकसित केल्या जात असून त्यापैकी २३ या मानवी चाचण्यांत आहेत. त्यातील दोन औषधांची भारतात चाचणी केली जात आहे. तथापि, अधिकृत सूत्रांनी हे मान्य केले की, भारतासमोर काही अडचणी येतील. कारण त्याने कोणत्याही जागतिक कंपनीत लशीवर संशोधन करण्यासाठी आणि ती विकसित करण्यासाठी गुंतवणूक केली नाही किंवा आगाऊ पैसे दिलेले नाहीत. अनेक श्रीमंत देशांनी मात्र अशी गुंतवणूक केलेली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाकडून काही निधी उपलब्ध केला गेला पण ती रक्कम फारच किरकोळ होती, असेही सूत्रांनी सांगितले.

टास्क फोर्स बिल गेट्स मेलिंदा फौंडेशन आणि कोवॅक्सवर (कोविड-१९ व्हॅक्सीन ग्लोबल अ‍ॅक्सेस) विसंबून राहात आहे. कोवॅक्समध्ये काही भारतीय कंपन्यांची तसेच बिल आणि मेलिंदा गेट्स फौडेंशन भागीदार आहेत. अपेक्षा अशी आहे की, ही आघाडी लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना पुरवेल. ‘हू’च्या सोमुम्या स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले की, देश द्विपक्षीय करार करू शकतात व तशी जोखीम घेणे हा त्यांचा भाग आहे.
इंडियन कॉन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकतेच अधिकृत निवेदनात म्हटले की, कोविड लस ही आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे.

या लशीला मागणी प्रचंड असल्यामुळे ती जेव्हा बाजारात येईल तेव्हा व्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. भारतातील किमान एका लस उत्पादकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘लस प्राप्त करण्यासाठी सरकारने आमच्यासोबत कोणतीही चर्चा सुरू केली नव्हती. लशीचे दोन अब्ज डोसेज तयार करण्याची भारताची क्षमता आहे.’’

रशियाची लस बुधवारी?
मॉस्को : जगाला ज्या लसीची प्रतीक्षा आहे ती कोरोनाची लस रशिया बुधवारी दाखल करणार आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ते याच आठवड्यात लस रजिस्टर करणार आहेत. ही लस रशियात सर्वांना देण्यात येणार आहे जेणेकरून कोरोनाविरुद्ध प्रतिकारक्षमता तयार होऊ शकेल.
रशियाच्या न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या लसीचे कोणतेही दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते. आॅक्टोबरपासून पूर्ण देशात ही लस देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. अलेक्झांडर गिटसबर्ग यांनी सांगितले की, जे पार्टिकल्स आणि आॅब्जेक्टस स्वत:ची कॉपी तयार करू शकतात त्यांना जीवित मानले जाते. या वॅक्सिनमध्ये जे पार्टिकल वापरले आहेत ते कॉपी बनवू शकत नाहीत.
अलेक्झांडर यांनी सांगितले की, काही लोकांना ही लस देण्यात आल्यानंतर ताप येऊ शकतो. त्यासाठी त्यांना पॅरासिटॉमॉल वापरण्याचा सल्ला दिला आहे. अलेक्झांडर यांच्याशिवाय संशोधन आणि या कामातील अन्य लोकांनी स्वत: ही लस घेतली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने आपली कोवॅक्स फॅसिलिटी जॉइन करण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेत रुग्णसंख्या झाली ५० लाखांवर
रोम : अमेरिकेत कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या रविवारी ५० लाख झाली. जगात अमेरिका वगळता कोणत्याही देशात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या एवढी नाही. जगात सगळ्यात शक्तिशाली असलेला अमेरिका कोविडला रोखण्यात अपयशी ठरला व त्यामुळे युरोपमध्ये धोक्याची घंटा वाजली आहे. फेब्रुवारीत कोरोनाच्या विषाणूने हल्ला केला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus India trying hard for corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.