Coronavirus in india pm narendra modi tweets on navratri 2020 SSS | Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खऱ्या हिरोंसाठी केली प्रार्थना

Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खऱ्या हिरोंसाठी केली प्रार्थना

 नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनलागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. देशात आज लॉकडाऊनचा पहिला दिवस आहे. तर दुसरीकडे चैत्र नवरात्रीलाही आजपासून सुरुवात झालेली आहे. पंतप्रधान मोदी यांनी हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. तुम्हाला आनंद, समृद्धी यासोबतच चांगले आरोग्य लाभो असे मोदींनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तसेच मोदींनी जनतेच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (25 मार्च) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी मेडिकल स्टाफ, पोलीस, मीडिया अशा अनेकांचा उल्लेख केला आहे. तसेच  देशभरात या दिवसांत अनेक उत्सव साजरे केले जातात. सगळ्यांनी हे उत्सव उत्साहात साजरे करावेत परंतु, आपल्या घरातच. हे सणच आपल्याला या संकटातून बाहेर पडण्याची प्रेरणा देतील असं देखील म्हटलं आहे. 

'आजपासून नवरात्रीला प्रारंभ होत आहे. मी गेल्या कित्येक वर्षांपासून मातेची आराधना करतो. यंदाची साधना मी मानवतेची उपासना करणाऱ्या आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकत्रित आलेल्या सर्व नर्स, डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस कर्मचारी आणि मीडिया कर्मचारी यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी, सुरक्षेसाठी तसंच सिद्धीसाठी समर्पित करतो' असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

 ‘देशात अनेक उत्सव साजरे केले जात आहेत. आजपासून नववर्षालाही सुरूवात होत आहे. उगादी, गुढीपाडवा, साजीबू चेराओबा आणि नवरेह यांच्या सर्वांना शुभेच्छा... यंदा दरवर्षीसारखा धुमधडाक्यात हे उत्सव साजरे होणार नाहीत पण हे उत्सवच आपल्याला या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देतील. देश असाच एकत्र मिळून करोनाशी लढत राहील' असं ट्विट मोदींनी केलं आहे.

चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूनं जगाला विळख्यात घेतलं आहे. अनेक देश कोरोनाच्या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. कोरोनानं भारतातही आतापर्यंत 11 जणांचा जीव गेला असून, काही जण कोरोना बाधित असलेले सापडत आहेत. मंगळवारच्या आलेखावर नजर टाकल्यास एक चांगली बातमी समोर आली आहे. मंगळवारी 64 नवे रुग्ण सापडले होते, ते सोमवारच्या तुलनेत फारच कमी होते. सोमवारी जवळपास 99 रुग्ण समोर आले होते. म्हणजेच कोरोनाच्या रुग्णांमध्ये आधीच्या तुलनेत घसरण होत असल्याचं निदर्शनास येतं आहे आणि ती भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 560 वर गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! देशातील रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद

Coronavirus : कोरोनाचा कहर! जगभरात तब्बल 18,892 लोकांना गमवावा लागला जीव

Coronavirus: आनंदाची बातमी! राज्यातील कोरोनाचे पहिले दोन रुग्ण बरे झाले; हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज मिळणार

Coronavirus: कोरोना व्हायरसच्या धास्तीनं लग्न ठरलेल्या २७ वर्षीय युवकाने लिहिलं थेट पंतप्रधानांना पत्र, म्हणाला...

Coronavirus : २१ दिवस लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus in india pm narendra modi tweets on navratri 2020 SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.