Corona vaccination: 1 मेपासून सुरू होणाऱ्या 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला ग्रहण; राज्यांकडे स्टॉक नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 15:57 IST2021-04-28T15:54:05+5:302021-04-28T15:57:03+5:30
1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरण खुले होईल. मात्र, या मोहिमेला ग्रहण लागताना दिसत आहे. कारण, आपल्याकडे मुबलक प्रमाणात लशी उपलब्ध नाहीत, असे अनेक राज्यांनी म्हटले आहे. (Corona vaccination)

Corona vaccination: 1 मेपासून सुरू होणाऱ्या 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला ग्रहण; राज्यांकडे स्टॉक नाही!
नवी दिल्ली - कोरोनाला मात देण्यासाठी देशभरात लसीकरण अभियान सुरू आहे. 1 मेपासून या अभियानाला नवा वेग येणार आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरण खुले होईल. मात्र, या मोहिमेला ग्रहण लागताना दिसत आहे. कारण, आपल्याकडे मुबलक प्रमाणात लशी उपलब्ध नाहीत, असे अनेक राज्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लसीकरण होणे अवघड आहे. तसेच, केंद्र सरकारचे म्हणणे आहे, की राज्य सरकारांकडे एक कोटीहून अधिक लशी उपलब्ध आहेत. (CoronaVaccine Corona vaccination india 1st may new phase vaccine shortage in Maharashtra)
1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या नव्या टप्प्यासंदर्भात केंद्र सरकारने म्हटले आहे, की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 1 कोटी लशी शिल्लक आहेत. तर पुढील तीन दिवसांत 80 लाख डोसदेखील पोहोचत आहेत. आतापर्यंत भारत सरकारने राज्यांना 15.65 कोटी लशी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, राज्यांनी आतापर्यंत एकूण 14.64 कोटी डोसचा वापर केला आहे. असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.
लशींसंदर्भात केंद्राचे राज्यांना निर्देश -
लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारांना पत्र लिहिले आहे. यात, 18 वर्षांवरील लोकांना लशीचा नवा सप्लाय मिळू शकेल, अशा पद्धतीने लशीच्या स्टॉकचा वापर करावा. लशीचा जो सप्लाय राज्यांना थेट होत आहे, त्याचा वापर 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांसाठी करण्यात यावा, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
केंद्राचे म्हणणे आहे, की लस निर्मात्यांकडून अर्धा सप्लाय केंद्राला दिला जाईल. जो केंद्राकडूनच राज्यांना वाटप केला जाईल. अशात केंद्राकडून राज्यांना लशींचा जो पुरवठा होत आहे, त्याचा वापर आतापर्यंत सुरू आहे, त्याप्रमाणेच 45 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी केला जावा.
अनेक राज्यांनी सांगितली समस्या -
महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, ओडिशा, अशा अनेक राज्यांनी लशींच्या कमतरतेचा मुद्दा उचलला आहे. तसेच अनेक ठिकाणी लसीकर थांबवण्याचीही वेळ आली आहे. लसीकरणाच्या नव्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी म्हटले आहे, की आमच्या राज्यात 18-45 वयोगटातील एकूण 3.25 कोटी लोक आहेत. त्यामुळे जवळपास 7 कोटी डोसची आवश्यकता आहे. आमच्या सरकारने आतापर्यंत 3.75 कोटी लशी बूक केल्या आहेत. मात्र, सीरम इंस्टिट्यूटने म्हटले आहे, की ते 15 मेपूर्वी लशी देऊ शकत नाहीत. अशात आम्ही लसीकरण कसे सुरू करणार?
राजस्थान प्रमाणेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे, की त्यांनी महाराष्ट्रासाठी दोन्ही कंपन्यांशी संपर्क साधला आहे. त्यांना किमान 12 कोटी डोस हवे आहेत. टोपे यांनी म्हटले आहे की त्यांनी दोन्ही कंपन्यांकडे आपली मागणी ठेवली आहे. मात्र, कुणाचेही उत्तर आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही 1 मेपासून लसीकरणाची सुरवात होण्यावर शंका व्यक्त केली जात आहे. याशिवाय पंजाब, छत्तीसगडनेही लशींचा सप्लाय मिळाला नसल्याचे म्हटले आहे.
Breaking! १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सर्वांना मोफत मिळणार कोरोना लस; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सर्वांना मोफत मिळणार लस -
राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोफत लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. तशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. अखेर आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: लसींचे १२ कोटी डोस लागतील. यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडेल.