मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा, समजून घ्या ‘कोरोना’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 03:58 AM2020-04-17T03:58:11+5:302020-04-17T03:58:25+5:30

सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठलेही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना विषाणूबाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की या आजाराची बाधा व लक्षणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

 Control Mental Stress, Understand 'Corona' | मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा, समजून घ्या ‘कोरोना’

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा, समजून घ्या ‘कोरोना’

Next

गेल्या दोन दिवसात कोरोना विषाणूमुळे २ आत्महत्या झाल्या. यातील एक बाधित व्यक्तीची होती तर दुसरी कुठलीही कोरोना विषाणूची लक्षणे नसलेली व्यक्ती होती. अशी टोकाची कृती काही विचार प्रक्रियेमुळे अमलात आणली जाते. काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार, ही मनात दाटून आलेली भीती व निराशा यामागे असून शकते. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व कोरोना विषाणूने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वत:ला संपवण्याची निराशेपोटी इच्छा दाटून येणे, यासोबत आधीपासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते.

सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठलेही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना विषाणूबाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की या आजाराची बाधा व लक्षणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ‘कोविड-१९’ची लागण झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे की, तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्क्यांमध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला ‘सायको न्युरो - इम्युनो अ‍ॅक्सीस’ असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर ‘कोविड-१९’च नव्हे तर कुठल्याही आजाराविरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून या विषाणूची बाधा झाली तरी खचून न जाणे हा उपचाराचाच भाग आहे, असे समजावे. हे कळते पण वळत नाही, अशी स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे, आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकांना मनमोकळेपणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.
- डॉ. अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title:  Control Mental Stress, Understand 'Corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.