काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:09 IST2025-10-29T13:07:00+5:302025-10-29T13:09:05+5:30
Assam Congress News: आसामामधील बराक व्हॅलीतील श्रीभूमी येथे काँग्रेस सेवा दलाच्या एखा कार्यक्रमात काँग्रेसच्या एका नेत्याने चक्कं बांगलादेशचं राष्ट्रगीत म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यात भारताच्या पूर्वोत्तर राज्यांबाबत बांगलादेशमधील नेतृत्वाकडून होणाऱ्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे दोन्ही देशातील अविश्वास कमालीचा वाढला आहे. अशा परिस्थितीत आसामामधील बराक व्हॅलीतील श्रीभूमी येथे काँग्रेस सेवा दलाच्या एखा कार्यक्रमात काँग्रेसच्या एका नेत्याने चक्कं बांगलादेशचं राष्ट्रगीत म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते बिधू भूषण दास यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातील ‘आमार सोनार बांगला’ हे बांगलादेशचं राष्ट्रगीत म्हटलं. त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर भाजपानेा याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने ही राजकीय मर्यादेमधील गंभीर चूक असल्याचं म्हटलं आहे. तसेच संबंधित नेत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर काँग्रेस सेवा दलाच्या श्रीभूमी विभागाचे अध्यक्ष राहिलेल्या बिधू भूषण दास यांनी सांगितले की, ‘मी केवळ रवींद्रनाथ टागोर यांचं रवींद्र संगीत गायलं होतं. मी बांगलादेशचं राष्ट्रगीत म्हटलेलं नाही’. मात्र भाजपाने हे कृत्य राजकीय मर्यादांचं उल्लंघन असल्याचं सांगत बिधू भूषण दास यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
आसाममधील भाजपाचे नेते आणि आसाम सरकारमधील मंत्री कृष्णेंदु पॉल यांनी या प्रकाराविरोधत आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली आहे. काँग्रेसचं सारं काही उलटं आहे. कधी काय गायचं हेही त्यांना माहिती नाही. या व्हिडीओची तपासणी करावी, अशी मागणी मी पोलिसांकडे करणार आहे. दरम्यान, हे आरोप राजकीय भावनेने प्रेरित असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. भाजपा सांस्कृतिक भावनांना राजकीय रंग देत आहे, असा पलटवार काँग्रेसने केला आहे. दास यांनी केवळ रवींद्रनाथ टागोर यांचं रवींद्र संगीत गायलं होतं, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसचे जिल्हा माध्यम प्रमुख शहादत अहमद चौधरी म्हणाले की, मी टागोर यांची गाणी गाणार आहे, असे दास यांनी सुरुवातीलाच सांगितले होते. खरंतर आमार सोनार बांगला हे गीत मुख्यत्वेकरून रवींद्रनाथ टागोर यांची रजना म्हणून ओळखलं जातं. बिधू भूषम दास प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकवतात. त्यांच्याकडून बांगलादेशचं राष्ट्रगीत म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे केवळ मातृभाषेवरील प्रेम होतं, असं स्पष्टीकरणही काँग्रेसकडून देण्यात आलं आहे.
खरंतर बांगलादेशच्या सीमेजवळील श्रीभूमीला आधी करीमगंज म्हणून ओळखलं जात असे. या परिसरामधील बहुतांश लोक हे बांगलाभाषी आहे. मात्र काँग्रेसचे नेते भारतीय राजकारणात आता दुसऱ्या देशाच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करणार का? असा थेट प्रश्न भाजपाने विचारला आहे.