"विधान परिषदेत सावरकरांची तसबीर लावणे हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान"; अखिलेश यादवांची टीका
By देवेश फडके | Updated: January 20, 2021 18:41 IST2021-01-20T18:38:21+5:302021-01-20T18:41:07+5:30
उत्तर प्रदेशमध्ये लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही तसबीर लावण्यात आली. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तसबिरीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

"विधान परिषदेत सावरकरांची तसबीर लावणे हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान"; अखिलेश यादवांची टीका
लखनऊ :उत्तर प्रदेशमध्ये लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सभागृहाची डागडुजी करण्यात आली. यामध्ये काही स्वातंत्र्यसैनिकांच्या तसबिरींचा समावेश करण्यात आला. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही तसबीर लावण्यात आली. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तसबिरीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) यावरून राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात विधान परिषदेचे सभापती रमेश यादव यांना पत्र लिहिण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तसबीर तातडीने काढून टाकली जावी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी इंग्रजांना पत्र लिहून माफी मागितली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे जिन्ना यांचे समर्थन करत दोन राष्ट्रांचा पुरस्कार केला होता, असे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य दीपक सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजसमोर आव्हान उभे केले होते. एवढेच नव्हे, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यात मतभेद निर्माण करून भांडणे लावली होती, असा गंभीर आरोप दीपक सिंह यांनी आपल्या पत्रात केला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेतील 'पिक्चर गॅलरी'चे उद्घाटन केले. याला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही विरोध दर्शवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी इंग्रजांना पत्र लिहून माफी मागितली होती, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. भाजपने इतिहास शिकण्याची गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची तसबीर लावणे म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.