एनसीईआरटीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी; सर्वोच्च न्यायालयाने दिले पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 06:06 IST2026-02-27T06:04:48+5:302026-02-27T06:06:58+5:30

सर्वोच्च न्यायालयाची कारवाई; गैरप्रकार करणाऱ्यांनी जणू गोळीबार करून न्याय यंत्रणेला रक्तबंबाळ केले.

Complete ban on 'that' NCERT book; Supreme Court takes action | एनसीईआरटीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी; सर्वोच्च न्यायालयाने दिले पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे आदेश

एनसीईआरटीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी; सर्वोच्च न्यायालयाने दिले पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे आदेश

नवी दिल्ली : न्याययंत्रणेतील भ्रष्टाचाराबद्दल धडा असलेल्या नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) या संस्थेने प्रकाशित केलेल्या इयत्ता आठवीच्या पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी संपूर्ण बंदी घातली. तसेच या पुस्तकाच्या छापील व डिजिटल प्रती जप्त करण्याचे आदेशही दिले. 

न्याययंत्रणेची बदनामी करण्याचे हे सुनियोजित कारस्थान आहे. असा गैरप्रकार करणाऱ्यांनी जणू गोळीबार करून न्याययंत्रणेला रक्तबंबाळ केले आहे असे ताशेरेही सर्वोच्च न्यायालयाने ओढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मार्च रोजी होणार आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची, न्या. विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. इयत्ता आठवीसाठी तयार केलेल्या 'एकस्प्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियाँड (खंड २) या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील अयोग्य मजकुराबद्दल एनसीईआरटीने बुधवारी माफी मागितली होती. ते प्रकरण पुन्हा लिहिण्यात येईल, असेही या संस्थेने सांगितले होते.

पंतप्रधानांच्या आदेशानंतर शिक्षणमंत्र्यांची दिलगिरी

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकामध्ये न्यायव्यवस्थेवर आधारित वादग्रस्त धडा समाविष्ट करण्यात आल्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिलगिरी व्यक्त केली.

भविष्यात अशा चुका होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच दिलगिरी व्यक्त करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधान यांना दिल्याचे कळते.

'अधिकारावर गदा नाही'

एनसीईआरटीच्या आठवीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या पुस्तकावर घातलेली संपूर्ण बंदी म्हणजे कोणत्याही योग्य टीकेला किंवा न्याययंत्रणेचे परीक्षण करण्याच्या अधिकारावर आणलेली गदा आहे, असे कोणीही समजू नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने आवर्जून म्हटले.

आदेशात काय म्हटले?

याप्रकरणी सखोल चौकशी करावी. पुस्तकाच्या छापील व डिजिटल प्रती जप्त कराव्यात. या पुस्तकाचे पुनर्मुद्रण, डिजिटल प्रसारावर पूर्ण बंदी घालण्यात येत आहे. या पुस्तकाच्या छापील किंवा डिजिटल प्रर्तीचे वितरण करण्याचा प्रयत्न हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन मानले जाईल.

'पाठ्यपुस्तक तयार करणारे कोण आहेत?'

या पाठ्यपुस्तकासाठी घेतलेल्या बैठका, आक्षेपार्ह प्रकरणावर चर्चा करून तो मंजूर करण्यात आला त्या प्रक्रियेची मूळ कागदपत्रे, पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्यांची नावे व त्यांची पात्रता याची माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने एनसीईआरटी संचालकांना दिले.

पुस्तकाच्या बाजारपेठेतील ३२ प्रती मागे घेतल्या

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी एनसीईआरटीच्या वतीने न्यायालयाला सांगितले की, वादग्रस्त पाठ्यपुस्तकाच्या ३२ प्रती बाजारपेठेत दाखल झाल्या होत्या. त्या मागे घेण्यात आल्या आहेत. अन्य प्रती वितरित करण्यात येणार नाहीत. या संपूर्ण प्रकरणाचे नव्याने व पूर्वीपेक्षा वेगळ्या तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल असेही मेहता म्हणाले.

Web Title : उच्चतम न्यायालय ने एनसीईआरटी की पुस्तक पर प्रतिबंध लगाया, प्रतियां जब्त करने का आदेश।

Web Summary : उच्चतम न्यायालय ने न्यायपालिका में भ्रष्टाचार पर एनसीईआरटी की कक्षा 8 की पुस्तक पर प्रतिबंध लगाया, प्रतियां जब्त करने का आदेश दिया। न्यायालय ने न्यायपालिका को बदनाम करने के लिए पुस्तक की आलोचना की और गहन जांच की मांग की। शिक्षा मंत्री और एनसीईआरटी ने माफी मांगी। अगली सुनवाई 11 मार्च को है।

Web Title : Supreme Court bans NCERT book, orders seizure of all copies.

Web Summary : The Supreme Court banned an NCERT class 8 textbook on judicial corruption, ordering its seizure. The court criticized the book as defaming the judiciary and demanded a thorough investigation. Apologies from education minister and NCERT followed. Further hearing is set for March 11.