Coldrif Syrup: देशभरात विषारी कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूंचा आकडा वाढत चालला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात 11 आणि राजस्थानमध्ये 3 मुलांचे मृत्यू झाल्यानंतर प्रशासन आणि केंद्र सरकारने कारवाई सुरू केली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) ने तमिळनाडू फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनला ‘Coldrif’ सिरप तयार करणाऱ्या Sresan Pharmaceutical कंपनीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्राची आपत्कालीन बैठक
केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिव, औषध नियंत्रकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहेत. बैठकीत कफ सिरपचा तर्कसंगत वापर, औषधांची गुणवत्ता आणि तपास प्रक्रिया यावर चर्चा होणार आहे.
मध्य प्रदेशात 11 बालमृत्यू, डॉक्टर अटक
छिंदवाडा जिल्ह्यात ‘Coldrif’ सिरप दिल्यानंतर 11 मुलांचा मृत्यू झाला. प्रशासनाने कडक कारवाई करत डॉ. प्रवीण सोनी याला अटक केली. त्याने मृत मुलांपैकी अनेकांना हे सिरप लिहून दिले होते. डॉ. सोनी आणि Sresan Pharmaceutical च्या संचालकांविरुद्ध ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्टच्या कलम 27(A) तसेच BNS कलम 105 आणि 276 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॅब अहवालात धक्कादायक बाब समोर आली
‘Coldrif’ सिरपमध्ये 48.6% डायएथिलीन ग्लायकोल (DEG) आढळले, जे अत्यंत विषारी आणि प्राणघातक रसायन आहे. छिंदवाडा जिल्हाधिकारी हरेंद्र नारायण यांनी सांगितले की, सर्व नमुने आणि कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली असून, कंपनीविरुद्ध FIR नोंदवली आहे. जिल्ह्यात लगेचच सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली.
मृत मुलांची नावे:
- शिवम
- विधी
- अदनान
- उसैद
- ऋषिका
- हेतांश
- विकास
- चंचलेश
- संध्या
- श्रेया
- योगिता
मुख्यमंत्री मोहन यादव काय म्हणाले?
या घटनेबाबत मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, “छिंदवाड्यातील मृत्यू अत्यंत दु:खद आहेत. आम्ही ‘Coldrif’ सिरपच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घातली आहे. कंपनीच्या इतर उत्पादनांवरही कारवाई होईल. दोषींना वाचवले जाणार नाही.”
राजस्थानात आणखी तीन बालमृत्यू
जयपूरमध्ये सहा वर्षांचा अंश या मुलाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, मुलाला घरात दिलेल्या कफ सिरपनंतर प्रकृती खालावली. याआधी भरतपूर आणि सीकर जिल्ह्यात दोन बालमृत्यू झाले होते. दोघांनाही सरकारी औषध योजनेत दिलेले Dextromethorphan Hydrobromide Syrup IP हे सिरप देण्यात आले होते, जे KAYSONS Pharma कंपनीने तयार केले होते. राज्य सरकारच्या तपासात मात्र हे सिरप “सुरक्षित” आढळले, असे आरोग्यमंत्री गजेन्द्र सिंह खीमसर यांनी सांगितले आहे.
दक्षिण भारतात सावधगिरी
तेलंगाणा ड्रग कंट्रोल अॅडमिनिस्ट्रेशनने ‘Coldrif’ सिरपच्या SR-13 बॅचवर “Public Alert – Stop Use Notice” जारी केली आहे. केरळ सरकारनेही विक्री तात्पुरती स्थगित केली असून सर्व नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, “फ्लॅग केलेला बॅच केरळमध्ये विकला गेला नाही, तरी सॅम्पल तपासणीसाठी पाठवले आहेत.”
CDSCO ची मोठी तपास मोहीम
केंद्रीय औषध नियंत्रकाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतील औषध कारखान्यांची तपासणी सुरू केली आहे. 19 सॅम्पल्स (कफ सिरप, अँटीबायोटिक्स, अँटीपायरेटिक्स) घेतले गेले असून त्यांचा उद्देश गुणवत्ता तपासणी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुधारणा करणे आहे. ICMR, NIV, NEERI, CDSCO आणि AIIMS-नागपूर या संस्थांच्या तज्ज्ञांची टीम छिंदवाड्यात पोहोचली असून ते किडनी फेल्युअर आणि मृत्यूंची मूळ कारणे शोधत आहेत.
Web Summary : Toxic 'Coldrif' cough syrup caused 14 child deaths, triggering investigations across six states. Diethylene glycol was found in the syrup. Authorities have arrested a doctor and banned the syrup's sale.
Web Summary : ज़हरीली 'कोल्ड्रिफ' कफ सिरप से 14 बच्चों की मौत, छह राज्यों में जांच शुरू। सिरप में डायथिलीन ग्लाइकॉल पाया गया। अधिकारियों ने एक डॉक्टर को गिरफ्तार किया और सिरप की बिक्री पर प्रतिबंध लगा दिया।