काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:14 IST2025-10-23T09:07:28+5:302025-10-23T09:14:20+5:30
बिहारमध्ये महाआघाडीतील सर्वात मोठा तिढा सुटल्याने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
Bihar Election: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'इंडिया' आघाडीतील जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला अंतर्गत तणाव आता संपुष्टात आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वावर महाआघाडीत अखेर एकमत झाले असून, गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि राजदमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटीला बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय झाला. काँग्रेस तेजस्वी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उभे करण्यास कचरत होती. मात्र आता काँग्रेस आता हा मुद्दा सोडून देण्यास तयार आहे.
'इंडिया' आघाडीतील वाढता तणाव आणि समन्वयाच्या अभावामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला हस्तक्षेप करावा लागला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत आणि बिहारचे प्रभारी कृष्णा अल्लावरु यांनी बुधवारी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची पाटणा येथील निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून सुरू असलेला वाद मिटवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. माध्यमांच्या वृत्तानुसार, या बैठकीमुळे दोन्ही पक्षांतील मतभेद कमी झाले असून, काँग्रेस आता तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे पाठिंबा देण्यास तयार झाली आहे.
काँग्रेस का होती नाराज?
तेजस्वी यादव यांनी यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते, मात्र काँग्रेसने तेजस्वी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यास टाळाटाळ केली होती. तसेच, आघाडीतील काही पक्षांनी इतर मित्रपक्षांच्या हितसंबंधांना डावलून उमेदवार घोषित केल्यामुळे आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या वाटाघाटीत आलेल्या गोंधळासाठी काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरु यांनाच पक्षातील काही लोक जबाबदार मानत होते.
आज होणार अधिकृत घोषणा
राष्ट्रीय जनता दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाआघाडीतील सर्व घटक पक्षांनी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. भाकपा (माले) चे सरचिटणीस दीपक भट्टाचार्य यांनीही गुरुवारी होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत तेजस्वी यांच्या नावाच्या घोषणेची अपेक्षा व्यक्त केली आहे. "बिहारमधील जनतेला माहीत आहे की, जर 'इंडिया' आघाडीला बहुमत मिळाले, तर तेजस्वी हेच मुख्यमंत्री असतील," असे भट्टाचार्य यांनी ठामपणे सांगितले. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी 'चलो बिहार.. बदलें बिहार' हे निवडणुकीचे मुख्य सूत्र घेऊन मैदानात उतरणार आहे.
तेजस्वी यांनीही आघाडीत कोणताही वाद नसल्याचे सांगून, गुरुवारी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सूचित केले होते. हॉटेल मौर्य येथे महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेची तयारी सुरू असून, या परिषदेत जागावाटपाचे अंतिम चित्र आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट होणार आहे. आघाडीने आपली अंतर्गत कमजोरी दूर करून आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.