ममता बॅनर्जी रस्त्यावर; कोलकात्यात भव्य मोर्चा, केंद्र-राज्य संघर्ष आता विकोपाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:22 IST2026-01-10T10:21:42+5:302026-01-10T10:22:19+5:30
ईडी आणि राज्य सरकारच्या एकमेकांविरोधात तक्रारी; बंगाली अस्मितेला साद घालण्याचा प्रयत्न

ममता बॅनर्जी रस्त्यावर; कोलकात्यात भव्य मोर्चा, केंद्र-राज्य संघर्ष आता विकोपाला
कोलकाता : ‘आयपॅक’ या राजकीय सल्लागार कंपनीवर गुरुवारी ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर राज्यात वातावरण तापले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर येऊन मोठे राजकीय शक्तिप्रदर्शन केले.
ईडीची कारवाई हे भाजपचे राजकारण असल्याचा राजकीय मुद्दा बनवत त्यांनी दक्षिण कोलकात्यात भव्य मोर्चाचे आयोजन केले. हा मोर्चा ८बी बस स्टँड परिसरापासून हाझरा मोरपर्यंत निघाला. यात वरिष्ठ मंत्री, खासदार, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांकडून केंद्र सरकारवर राजकीय सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचाी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बंगाली अस्मितेला आवाहन
ममतादीदींच्या या मोर्चाला बंगाली अस्मितेची जोड होती. कार्यकर्त्यांनी प्रतुल मुखोपाध्याय यांचे प्रसिद्ध गाणे ‘आमी बांगलाय गान गाई’ गायले, तर महिलांनी शंख फुंकले. आपली ओळख असलेली पांढरी सुती साडी, शाल आणि चपला अशा साध्या वेशात बॅनर्जी मोर्चाच्या अग्रभागी होत्या. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या नागरिकांना त्या अधूनमधून अभिवादन करीत होत्या.
न्यायालयात प्रचंड गोंधळ; १४ पर्यंत सुनावणी तहकूब
‘आयपॅक’ संबंधित याचिकांची शुक्रवारी होणारी सुनावणी प्रचंड गोंधळ झाल्याने कलकत्ता उच्च न्यायालयाने तहकूब केली. शुक्रवारी सकाळी न्या. सुर्वा घोष यांच्यापुढे सुनावणी सुरू झाली. पण, न्यायालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली व गोंधळ सुरू झाला. ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, त्यांना बाहेर जाण्याची विनंती करूनही गर्दी हटत नव्हती. अखेर परिस्थिती हाताबाहेर झाल्याचे पाहून न्या. घोष यांनी ही सुनावणी १४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली.
यानंतर ‘ईडी’ने तातडीने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती सुजॉय पॉल यांच्याकडे धाव घेऊन शुक्रवारीच सुनावणी घेण्याची अधिकृत विनंती केली; मात्र, ती फेटाळण्यात आली. न्या. घोष यांनी दिलेल्या न्यायालयीन आदेशात हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही, असे मत प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केले.
‘ईडी’विरुद्ध एफआयआर
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी ‘आयपॅक’चे कार्यालय आणि तिचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या निवासस्थानावरील छाप्यांच्या संदर्भात ईडीविरुद्ध दोन पोलिस तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर कोलकाता आणि बिधाननगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या तक्रार आणि हायकोर्टातील याचिकेमुळे केंद्र आणि राज्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. ‘ईडी’ने या प्रकरणी हायकोर्टात धाव घेऊन या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची विनंती केली आहे.
‘सीबीआय तपास हवा’
‘आयपॅक’वरील छाप्यांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत ईडीने कलकत्ता हायकोर्टात धाव घेतली.
पीएमएलए अंतर्गत या तपासात हस्तक्षेप करू नका, अशी विनंती करूनही मुख्यमंत्री यांनी परिसरात प्रवेश केला. स्वतंत्र साक्षीदारांना ‘हायजॅक’ करण्यात आले, असा ईडीचा आरोप आहे.