स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत

By Admin | Updated: February 27, 2015 02:33 IST2015-02-27T02:33:53+5:302015-02-27T02:33:53+5:30

भारतीय रेल्वेच्या या अंदाजपत्रकात उच्चस्तरीय स्वच्छतेच्या मुद्द्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भर दिला आहे. रेल्वे ही प्रवासादरम्यान आपले स्वत:चे घर

Clean rail, clean India | स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत

स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत

भारतीय रेल्वेच्या या अंदाजपत्रकात उच्चस्तरीय स्वच्छतेच्या मुद्द्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भर दिला आहे. रेल्वे ही प्रवासादरम्यान आपले स्वत:चे घर आहे, असे समजून सरकारच्या या योजनेत सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांना केले आहे. सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रेल्वे मंत्रालय आता ‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ योजनेसाठी काम करणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयात रेल्वे स्टेशन आणि डब्यांच्या स्वच्छतेसाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. यासाठी स्वच्छतेच्या क्षेत्रातील व्यावसायिक कंपन्यांची सेवा घेण्यात येणार असून, रेल्वे कर्मचाऱ्यांना सेवा-स्वच्छतेच्या नव्या पद्धतीसाठी खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संशोधन, आराखडा आणि मानक संघटन या त्रिसूत्रीच्या आधारे सहा महिन्यांत व्हॅक्युम स्वच्छतागृहे उभारण्याचा आराखडा तयार करण्यावर काम सुरू आहे. त्याचप्रमाणे आॅनबोर्ड हाउस किपिंग सर्व्हिसची गुणवत्ता सुधारण्यावर रेल्वे मंत्रालयातर्फे भर देण्यात येणार आहे. सध्या ही सेवा ५00 जोड डब्यांत सुरू आहे. ग्राहकांच्या तक्रारींवर तत्काळ उपाय योजण्यावर रेल्वे मंत्रालयाचा भर आहे. प्रवाशांच्या बिछान्यासोबतच त्यांना कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र बॅग देण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी त्यांच्याजवळचा कचरा त्यात जमा करू शकतात.
वातानुकूलित नसणाऱ्या डब्यात कचरापेट्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मोठ्या रेल्वे कोचिंग टर्मिनल्सजवळ टाकाऊ वस्तूंपासून ऊर्जानिर्मिती करणाऱ्या प्लॅन्टसची निर्मिती करण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत एका प्रायोगिक तत्त्वावर प्लॅन्टसची उभारणी करण्यात येणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही योजना सर्वत्र कार्यान्वित करण्यात येणार आहे, असेही प्रभू यांनी सांगितले.

६५०- रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, डब्यातील स्वच्छतागृहांत सुधारणा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या १२0 स्थानकांच्या तुलनेत यंदा ६५0 अतिरिक्त स्थानकांवर नवी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. प्रवासी डब्यांत १७ हजार जैव स्वच्छतागृहे (बायो टॉयलेट्स) उभारण्यात येणार आहेत. यापूर्वी १७,३८८ जैव स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.

१३८ -रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी हेल्पलाइन
सुरूकरण्याची घोषणा केली़ १३८
हा या हेल्पलाइनचा क्रमांक असून, सुरक्षाविषयक तक्रारींसाठी १८२ हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला़ १३८ हा क्रमांक २४ तास सुरू असेल़ या क्रमांकावर संपर्क साधून प्रवासी आपल्या तक्रारी वा समस्या नोंदवू शकतील़ तसेच सुरक्षेसंदर्भातील तक्रारी १८२ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवता येतील, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले़

Web Title: Clean rail, clean India