शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:37 IST2025-08-29T14:32:34+5:302025-08-29T14:37:27+5:30
शाळेतील शौचालयात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली.

शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
ळेतील शौचालयात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली. विद्यार्थिनीने शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकेला नको त्या अवस्थेत पाहिले. याबद्दल कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून तिला जिवंत जाळण्यात आले, असा आरोप तिच्या पालकांनी केला. ही घटना बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास चितकोहरा कन्या मध्य विद्यालयाच्या बाथरूममध्ये घडली. त्यानंतर पोलिसांनी दुपारी १२ वाजता मुलीला जाळल्याची माहिती कुटुंबाला दिली.
मृत विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील चिटकोहरामध्ये भाजीपाला विकतात आणि तिची आई घरकाम करते. मृत मुलीच्या घरच्यांनी आरोप केला आहे की, विद्यार्थिनीच्या बहिणीने शाळेतील एक शिक्षक आणि शिक्षिकेला नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर संबंधित शिक्षिकेने या घटनेबाबत कुठेही वाच्यता न करण्याची विद्यार्थिनीला धमकी दिली. या विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, याबद्दल ती मुख्याध्यापकांना सांगणार होती. मृत विद्यार्थिनीच्या वडिलांचा आरोप आहे की, शाळेतील शिक्षक त्यांच्या मुलीच्या हत्येत सहभागी आहेत आणि मुलीच्या खुन्यांना फाशी देण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीच्या वडिलांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी शाळेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. परंतु, सर्वच खराब असल्याचे आढळून आले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सचिवालय डीएसपी-१ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. घटनेच्या वेळी शौचालयाचा दरवाजा आतून बंद असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी पोलिसांनी शाळेतील शिक्षक आणि जवळच्या लोकांची चौकशी केली असून पुढील तपास सुरू आहे.