मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; हिंसाचारात एक ठार, अनेक जखमी; जमाव पांगवण्यासाठी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 06:42 IST2025-03-20T06:41:18+5:302025-03-20T06:42:04+5:30
मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात ‘झोमी’ आणि ‘हमार’ जमातींच्या लोकांमध्ये झालेल्या ताज्या संघर्षात अनेक लोक जखमी झाले आहेत.

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; हिंसाचारात एक ठार, अनेक जखमी; जमाव पांगवण्यासाठी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या
इंफाळ : मणिपूरच्या चुराचांदपूरमध्ये सोमवारी दोन वांशिक गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर उफाळलेल्या कुकी-झो-बहुल जिल्ह्यात नव्याने हिंसाचार उसळल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा एका ५३ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली.
मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात ‘झोमी’ आणि ‘हमार’ जमातींच्या लोकांमध्ये झालेल्या ताज्या संघर्षात अनेक लोक जखमी झाले आहेत. येथील दोन्ही समुदायांच्या प्रमुख संघटनांमध्ये शांतता करार झाला असताना मंगळवारी रात्री उशिरा चुराचंदपूर शहरात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला.
शहरातील काही लोकांच्या गटाने ‘झोमी’ या अतिरेकी गटाचा
ध्वज काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा नवीन संघर्ष सुरू झाला. जमावाने परिसरात तोडफोड केली आणि काही लोकांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर गोळीबारही केला.
बंद मागे घेण्याचे आवाहन
‘हमार इनपुई’ आणि ‘झोमी कौन्सिल’ यांनी मंगळवारी ‘बंद’ मागे घेण्याचा आणि जिल्ह्यातील सामान्य जीवन विस्कळीत करणाऱ्या सर्व घटनांचा अंत करण्यासंदर्भात करार केला होता. ‘हमार इनपुई’चे सरचिटणीस रिचर्ड हमार यांच्यावर रविवारी ‘झोमी’ समुदायाच्या सदस्यांनी हल्ला केला, ज्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये हिंसाचार झाला आणि दुसऱ्या दिवशी कर्फ्यू लागू करण्यात आला.
सुरक्षा दलांनी शहरात काढला ‘फ्लॅग मार्च’
‘झोमी’ आणि ‘हमार’ समुदायांमधील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याने सुरक्षा दलांनी शहरात ‘फ्लॅग मार्च’ काढला आणि लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. या घटनेला प्रतिसाद म्हणून, झोमी विद्यार्थी संघटनेने जिल्ह्यात ‘बंद’ची हाक दिली.
जिल्हा प्रशासनाने सहकार्याचे आवाहन
अधिकाऱ्याने सांगितले की, लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या जमावाने दगडफेक सुरू केली, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि हवेत गोळीबार करावा लागला. जिल्हा प्रशासनाने सहकार्य आवाहन केले आहे.