वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:16 IST2025-10-06T14:14:30+5:302025-10-06T14:16:48+5:30
CJI Bhushan Gavai: एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने काही वस्तू फेकडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
CJI Bhushan Gavai: देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काही अतिशय महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठांसमोरही विविध याचिकांवर सुनावणी होत आहे. यातच सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात एक वेगळाच प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने एक वस्तू फेकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. यावर भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया समोर आल्याचे बोलले जात आहे.
लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने काही वस्तू फेकण्याच्या प्रयत्न झाल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली. त्यांना न्यायालयाच्या कक्षातून बाहेर काढले. या घटनेनंतर, न्यायालयीन कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते, परंतु नंतर ते सुरळीतपणे सुरू झाले.
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया
घटनेच्या वेळी उपस्थित वकिलांच्या मते, त्या व्यक्तीने “सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान” अशी घोषणा दिली. काही उपस्थितांच्या म्हणण्यानुसार, सदर व्यक्तीने सरन्यायाधीशांकडे काही वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला, तर काहींच्या मते त्याने कागदाचा गुंडाळा फेकला होता. विशेष म्हणजे, तो व्यक्ती वकिलाच्या काळ्या कोटात परिधान करून आला होता. या अनपेक्षित घटनेनंतरही सरन्यायाधीश गवई यांनी पूर्ण शांतता आणि संयम राखला आणि उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, या घटनेमुळे विचलित होऊ नका, आम्हीही झालो नाही.
दरम्यान, या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालय परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सरन्यायाधीश भुषण रामकृष्ण गवई हे सध्या भारताचे ५२ वे सरन्यायाधीश असून, त्यांच्या कार्यकाळात न्यायालयीन निर्णयांबरोबरच काही घटनांमुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.