Maratha Kranti Morcha: छत्रपती संभाजी राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 13:38 IST2018-07-24T13:34:29+5:302018-07-24T13:38:50+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा आज संसदेतही उपस्थित झाला असून, राज्यसभेमध्ये खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Maratha Kranti Morcha: छत्रपती संभाजी राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा
नवी दिल्ली - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा आज संसदेतही उपस्थित झाला असून, राज्यसभेमध्ये खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत यासंदर्भात कोणतेही राजकारण न करता सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याची मागणी केली.
राज्यसभेमध्ये मराठी भाषेतून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले, "राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली बहुजन समाजाला भारतात पहिल्यांदा आरक्षण दिले होते. आरक्षण मिळालेल्या समाजामध्ये एससी, एसटी, ओबीसी यांच्यासोबत मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र स्वातंत्रोत्तर काळात मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी अनेक मोर्चे निघाले. या मोर्चांची दखल केवळ देशातच नव्हे तर परदेशातली घेतली गेली. मात्र आज परिस्थिती बिघडली आहे. मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून तोडगा काढण्याची गरज आहे."
सध्या पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी संभाजी राजेंनी दोन उपाय सूचवले आहेत. ते म्हणाले, यावर तोडगा काढण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांनी त्वरित मराठा समजातील घटकांशी चर्चा करावी. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या मागण्या त्वरित सोडवाव्यात. दुसरी माझी मागणी म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण न करता सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना बोलावून मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात .