Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 13:15 IST2025-07-03T13:15:22+5:302025-07-03T13:15:57+5:30
Bageshwar Dham Tent Collapse: बागेश्वर धाममध्ये टिन शेड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला आणि ८ जण जखमी झाले.

फोटो - आजतक
Bageshwar Dham Accident:मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाममध्ये टिन शेड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला आणि ८ जण जखमी झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस प्रशासनाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. तसेच मदत आणि बचावकार्य सुरू केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाबा बागेश्वर यांचे काही भक्त हे टिन शेडखाली उभे होते. याच दरम्यान शेड कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक खाली पडले.
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजेश यांचे सासरे श्यामलाल कौशल (५० वर्षे) यांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजेच ४ जुलै रोजी धीरेंद्र शास्त्री यांचा वाढदिवस आहे. यामुळे त्यांचं कुटुंब उत्तर प्रदेशहून बागेश्वर धामला आलं होतं. गुरुवारी सकाळी सर्वजण तयारी करून शास्त्रींना भेटण्यासाठी पोहोचले. याच दरम्यान ही घटना घडली.