राजीनामा पाठविणाऱ्या आमदाराला विधानसभा समितीचे अध्यक्षपद, राजस्थानमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 14:44 IST2021-07-04T14:41:32+5:302021-07-04T14:44:55+5:30
सचिन पायलट यांच्या गटाचे मानले जात असलेले चौधरी हे बाडमेरच्या गुढामलानी विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून आले आहेत.

राजीनामा पाठविणाऱ्या आमदाराला विधानसभा समितीचे अध्यक्षपद, राजस्थानमधील प्रकार
जयपूर : काही दिवसांपूर्वी आपला राजीनामा पाठविणारे काँग्रेस आमदार हेमाराम चौधरी यांना विधानसभेच्या उपक्रम समितीचा अध्यक्ष करण्यात आले आहे. सभागृह अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी ही नियुक्ती केली आहे.
सचिन पायलट यांच्या गटाचे मानले जात असलेले चौधरी हे बाडमेरच्या गुढामलानी विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून आले आहेत. १८ मे रोजी त्यांनी विधानसभा सचिवालयाकडे राजीनामा पाठविला होता. तथापि, त्यावर आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. सचिवालयाने म्हटले आहे की, लॉकडाऊन हटविल्यानंतर ते विधानसभा अध्यक्षांची भेट घेतील. ही भेट अद्याप झालेली नाही.
विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी शुक्रवारी विधानसभा प्रक्रिया व कार्य संचालन संबंधी नियमांतर्गत वर्ष २०२१-२२ साठी चार वित्तीय व १५ अन्य समित्यांचे गठन केले. यात राजकीय उपक्रम समितीचे अध्यक्षपद चौधरी यांना देण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री पायलट यांच्या गटातील अनेक आमदारांना यात स्थान देण्यात आलेले आहे. झुंझुनूचे आ. बृजेंद्र ओला यांना प्रश्न व संदर्भ समितीचे सभापतीपद, दीपेंद्र सिंह यांना सदाचार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले.
जनलेखा समितीवर गुलाबचंद कटारिया
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांना सरकारी आश्वासनांच्या संबंधी समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांकडून गठित समितीतीत जनलेखा समितीमध्ये विरोधी पक्षाचे गुलाबचंद कटारिया यांना सभापती करण्यात आले आहे.