महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 05:37 IST2025-10-20T05:33:30+5:302025-10-20T05:37:43+5:30
केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२५-२६साठी एसडीआरएफच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक सरकारांना १,९५०.८० कोटी रुपयांची अग्रीम मदत देण्यास मान्यता दिली आहे.
एकूण रकमेपैकी कर्नाटकसाठी ३८४.४० कोटी रुपये व महाराष्ट्रासाठी १,५६६.४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामुळे या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना तत्काळ मदत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकारपूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून विविध राज्यांना मदत देणे सुरूच
यावर्षी, केंद्र सरकारने एसडीआरएफअंतर्गत २७ राज्यांना १३,६०३.२० कोटी रुपये आणि एनडीआरएफअंतर्गत १५ राज्यांना २,१८९.२८ कोटी रुपये दिले आहेत. याव्यतिरिक्त, राज्य आपत्ती निवारण निधीमधून (एसडीएमएफ) २१ राज्यांना ४,५७१.३० कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीएमएफ) मधून नऊ राज्यांना ३७२.०९ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने आज दिलेला मदतीचा दुसरा हप्ता ही अग्रीम मदत आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. अंतिम मदत मिळण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे आणि ही कार्यवाही पूर्ण होतात केंद्र सरकार मदत देणार आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री,