सीबीएसई नववीत घोकमपट्टीची गरज आता नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 08:00 IST2025-08-11T07:52:38+5:302025-08-11T08:00:01+5:30
विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल आणि घोकमपट्टीची प्रवृत्तीही कमी होईल

सीबीएसई नववीत घोकमपट्टीची गरज आता नाही
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता नववीच्या वर्गासाठी ओपन बुक असेसमेंट स्ट्रॅटेजी (ओबीएएस) सादर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. एका पायलट अभ्यासात अशा मूल्यांकनासाठी शिक्षकांचा पाठिंबा असल्याचे उघड झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सीबीएसईच्या नियामक मंडळाने जूनमध्ये झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली.
हा निर्णय नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन (एनसीएफएसई) च्या दिशानिर्देशांशी सुसंगत आहे. २०२३ पासून सुरू झालेल्या या फ्रेमवर्कचा उद्देश पारंपरिक रटाळ पद्धतीऐवजी कौशल्याधारित शिक्षणावर भर देणे आहे, जे विद्यार्थ्यांना विषयांचे सखोल आकलन आणि समज विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करते.
विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी, आत्मविश्वासात वाढ
एका पायलट अभ्यासात विद्यार्थ्यांच्या कामगिरीशी संबंधित अडचणी समोर आल्या होत्या. ओपन बुक असेसमेंटद्वारे या अडचणी सोडवता येतील, तसेच विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा दबावही कमी होईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे. यामुळे त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल आणि घोकमपट्टीची प्रवृत्तीही कमी होईल.
ज्ञानाधिष्ठित शिक्षणाला मिळणार चालना
ओपन बुक असेसमेंट स्ट्रॅटेजीअंतर्गत मुख्य विषयांमध्ये दर शैक्षणिक सत्रात तीन पेन-पेपर प्रकारच्या मूल्यांकनांमध्ये ओपन बुक स्वरूपाचा समावेश असेल. यामध्ये स्टैंडर्डाइज्ड मॉडेल पेपर्स आणि मार्गदर्शन तत्त्वांसह संदर्भ साहित्याचा प्रभावी वापर कसा करावा, यासाठी विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे. हे त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयुक्त आणि वास्तवाशी जोडलेला वापर करण्यासाठी सक्षम करेल.