पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:35 IST2025-05-20T10:32:50+5:302025-05-20T10:35:51+5:30
ज्योती मल्होत्राचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका पुरूषासोबत दिसत आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या संशयावरून देशातील ३ राज्यांमधून ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. या सर्व लोकांमध्ये, सर्वात जास्त चर्चेत असलेले एक नाव म्हणजे युट्यूबर ज्योती मल्होत्रा. ज्योतीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. ज्योती मल्होत्रा 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवते. ज्योतीने अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे, ज्याचे व्हिडीओ तिच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. आता पोलीस तिची चौकशी करण्यासोबतच तिचे व्हिडीओ देखील तपासत आहेत. यात आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे.
ज्योतीचा पाकिस्तानी दूतावासाशी संबंध!
ज्योती मल्होत्रा नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात असलेल्या दानिशला भेटली होती. या दानिशला भारत सरकारने देशातून हाकलून लावले आहे. दानिशवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करण्याचा आणि पाकिस्तानला अनेक संवेदनशील माहिती देण्याचा आरोप आहे. १३ मे रोजी भारत सरकारने दानिशला पाकिस्तानात परतण्याचे आदेश दिले.
दानिशच्या संपर्कात आल्यानंतर, ज्योतीने अनेक वेळा पाकिस्तानी दूतावासाला भेट दिली आहे. तिला अनेक पार्ट्यांमध्येही आमंत्रित करण्यात आले होते, ज्याचे व्लॉग ज्योतीच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येतील. आता, ज्योतीचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका पुरूषासोबत दिसत आहे. तिच्या सोबत दिसलेला हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय आहे, ज्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
The person who brought cake to Pakistan High Commission on next day of Pahalgam Attack is also seen in video of Pakistani Spy Jyoti Malhotra. pic.twitter.com/OgFun57zAD
— Incognito (@Incognito_qfs) May 19, 2025
पोलीस शोधतायत प्रश्नांची उत्तरं!
२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी दूतावासाबाहेरून एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये एक माणूस हातात केक घेऊन दूतावासाकडे लगबगीने जाताना दिसला होता. या व्यक्तीला यापूर्वीही ज्योतीसोबत पार्ट्यांमध्ये पाहिले गेले आहे. याचा आणि ज्योतीचा काय संबंध? याची ज्योतीशी भेट कशी झाली? भारतीय तपास यंत्रणा या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.