Budget Session 2023: अदानी-हिंडेनबर्ग प्रकणावरुन भाजपला घेरण्याची तयारी; विरोधकांची इमरजन्सी मीटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 13:34 IST2023-02-03T13:33:56+5:302023-02-03T13:34:18+5:30
Budget Session 2023: अदानी समुहाविरोधात हिंडेनबर्ग रिपोर्टमधील आरोपांच्या चौकशीची मागणी विरोधक करत आहेत.

Budget Session 2023: अदानी-हिंडेनबर्ग प्रकणावरुन भाजपला घेरण्याची तयारी; विरोधकांची इमरजन्सी मीटिंग
Mallikarjun Kharge Called Opposition Meeting: सध्या देशभरात हिंडेनबर्ग रिपोर्ट (Hindenberg) आणि अदानी (Gautam Adani) समुहाचा मुद्दा गाजत आहे. या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटल्याचे पाहायला मिळत आहे. यावरुनच काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता संसदेतील त्यांच्या कार्यालयात विरोधी पक्षांच्या खासदारांची तातडीची बैठक बोलावली. यात 16 पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गेंनी बोलावलेल्या बैठकीत चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये कशाप्रकारची रणनीती आखली जावी, यावर चर्चा झाली. काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, सीपीआय(एम), सीपीआय, एनसीपी, नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन युनियन मुस्लिम लीग, केसी (जोस मणी), के.सी. (थॉमस) आणि आरएसपीचे खासदार बैठकीत सहभागी झाले होते.
नेमकं काय झालं?
गुरुवारी (2 फेब्रुवारी) संसदेत उद्योगपती अदानी यांच्याबाबतच्या हिंडेनबर्ग अहवालावरून प्रचंड गदारोळ झाला, त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. अदानी समूहाविरुद्ध हिंडेनबर्ग अहवालात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा संयुक्त संसदीय समितीमार्फत निष्पक्ष चौकशीची मागणी विरोधी पक्ष करत आहेत.
दोन्ही सभागृहात गदारोळ
लोकसभा आणि राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी या मागणीबाबत नोटीस दिली, जी सभापतींनी फेटाळली. यावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केला, त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. दरम्यान, काँग्रेसने 6 फेब्रुवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांतील एलआयसी आणि एसबीआयच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.