सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:54 IST2025-11-20T16:52:55+5:302025-11-20T16:54:13+5:30
लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर पाठवणीच्या आधीच फरार झाली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर पाठवणीच्या आधीच नवरी फरार झाली. नवरीचा अनेक तास शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही, त्यामुळे नवरदेवाला तिच्याशिवाय परत येण्याची वेळ आली. नवरदेवाच्या कुटुंबाने नवरीच्या कुटुंबाविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली शहरातील बांकी शहरात ही घटना घडली. शहरातील रहिवासी बंशीलाल गौतम यांची मुलगी पल्लवी हिचं घुंघटेर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी सुनील गौतमशी लग्न झालं होतं. मंगळवारी रात्री लग्नाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात आली. पाहुण्याचं स्वागत करण्यात आलं, विवाह सोहळा संपन्न झाला. सुनील कुमार आणि पल्लवी यांनीही स्टेजवर डान्स केला.
नवरदेवाने दिलेल्या माहितीनुसार, लग्नादरम्यान कोणतीही कमतरता भासू नये म्हणून त्याने त्याची जमीन १.६० लाख रुपयांना गहाण ठेवली आणि नवरीसाठी दागिने बनवले. लग्नात ११ वाहनांमधून सुमारे ९० पाहुणे आले. लग्नानंतर पाठवणीच्या वेळी कुटुंबीयांना नवरी तिच्या खोलीतून गायब असल्याचं लक्षात आलं.
सुरुवातीला त्यांना वाटलं की, नवरी जवळपास कुठेतरी असेल, परंतु शोध घेऊनही दुपारपर्यंत ती सापडली नाही, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चौकशीनंतर नवरी प्रियकरासोबत पळून गेल्याचं म्हटलं जात आहे. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण केल्यानंतर नवरीने रात्री तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याची संधी साधली असा लोकांना संशय आहे. सध्या तपास सुरू आहे.