अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 09:12 IST2025-07-09T09:11:55+5:302025-07-09T09:12:35+5:30
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा त्याच्या ४० वर्षीय सावत्र आईसोबत पळून गेला.

अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा त्याच्या ४० वर्षीय सावत्र आईसोबत पळून गेला. या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. गेल्या १५ वर्षांपासून ते दुसऱ्या पत्नीसोबत राहत होते.
मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी ते पहिल्या पत्नीपासूनच्या मुलाला आपल्याकडे राहायला घेऊन आले होते. मुलगा सावत्र आईला त्याची आई मानायचा आणि नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यायचा. पण दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत हे घरामध्ये कोणालाही माहिती नव्हतं. काही दिवसांपूर्वी दोघेही अचानक पळून गेले.
जेव्हा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी मुलाचे वडील पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की, मुलगा आणि दुसऱ्या पत्नीचं कोर्टात लग्न झालं आहे. मात्र मुलगा १७ वर्षांचा असून तो अल्पवयीन आहे, त्यामुळे हे लग्न बेकायदेशीर आहे. पोलिसांचे म्हणणं आहे की, मुलाने न्यायालयात तो अल्पवयीन नसल्याचा पुरावा दिला आहे, ज्याची सध्या चौकशी सुरू आहे.
मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, दुसऱ्या पत्नीने घरातून ३० हजार रुपये रोख, चांदीचे पैंजण, सोन्याचे कानातले, बांगड्या सोबत नेल्या आहेत. आता या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुलाच्या वडिलांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र या घटनेने कुटुंबीयांसह गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.