साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:05 IST2025-09-17T15:04:52+5:302025-09-17T15:05:18+5:30

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील धामपूर शुगर मिलमधील वेस्टेज प्लँटच्या टँकरमध्ये दोन तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये ड्रायव्हर आमि त्याच्या मित्राचा समावेश आहे.

Bodies of two youths found in sugar factory tanker, guard and officer missing | साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील धामपूर शुगर मिलमधील वेस्टेज प्लँटच्या टँकरमध्ये दोन तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये ड्रायव्हर आमि त्याच्या मित्राचा समावेश आहे. मृतदेह सापडल्याची खबर मिळाल्यानंतर घटनास्थळी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. या दरम्यान साखर कारखान्यातील गार्ड आणि अधिकारी घटवनास्थळावरून बेपत्ता होते. मृतदेह पाहिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी गोंधळ घालत संताप व्यक्त केला. या दोघांचीही हत्या करून मृतदेह टँकरमध्ये टाकण्यात आल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धामपूर गावातील रहिवासी असलेला मुकेश हा साखर कारखान्यामध्ये टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ड्ररायव्हर होता. त्याची शेजारच्या गावातील सलमानसोबत मैत्री होती. दरम्यान, घटना घडली त्या दिवशी मुकेश सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडला होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. तर सलमान मंगळवारी दुपारी घरातून बाहेर पडून धामपूरला गेला होता, असे त्याचा भाऊ अरमान याने सांगितले. आता या दोघांचेही मृतदेह टँकरमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

मृतदेह सापडल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह टँकरमधून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नेण्याची तयारी केली. तेव्हा ग्रामस्थांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. टँकर साफ करत असताना त्यातील गॅसमुळे गुदमरून या दोघांचाही मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र पोलिसांकडून करण्यात येत असलेला दावा पटत नसल्याने ग्रामस्थांनी मृतदेहांना हात लावू दिला नाही. या दोघांचीही हत्या करून मृतदेह टँकरमध्ये फेकण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अखेरीस शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचं आश्वासन देऊन पोलिसांनी हे मृतदेह तिथून ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. आता या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: Bodies of two youths found in sugar factory tanker, guard and officer missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.