पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 08:53 IST2025-08-18T08:52:52+5:302025-08-18T08:53:46+5:30
Rajasthan Crime News: गेल्या काही महिन्यांमध्ये निळ्या ड्रममध्ये मृतदेह सापडण्याच्या अनेक घटना घडल्याने निळ्या ड्रमाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, आता राजस्थानमधील खैरथल तिजारा जिल्ह्यात एका घराच्या छतावर निळ्या ड्रमामध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता
गेल्या काही महिन्यांमध्ये निळ्या ड्रममध्ये मृतदेह सापडण्याच्या अनेक घटना घडल्याने निळ्या ड्रमाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, आता राजस्थानमधील खैरथल तिजारा जिल्ह्यात एका घराच्या छतावर निळ्या ड्रमामध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर तरुण हा उत्तर प्रदेशमधील रहिवासी होता. तो त्याच्या कुटुंबासह किशनगड बास येथे असलेल्या आदर्श कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. सध्या त्याची पत्नी आणि मुले बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डीएसपी राजेंद्र सिंह निर्वाण यांनी सांगितले की, मृत व्यक्तीची ओळख उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या हंसराम ऊर्फ सूरज याच्या रूपात पटली आहे. हंसराम त्याची पत्नी आणि तीन मुलांसह किसनगडबास येथील आदर्श कॉलनीमध्ये राहत होता. शेजाऱ्यांना तो राहत असलेल्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने शोधाशोध करण्यात आली. तेव्हा घराच्या छतावर एका निळ्या ड्रमामध्ये हंसराम याचा मृतदेह सापडला. या मृतदेहावर धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा होत्या.
पोलिस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, मृतदेहाचे लवकरात लवकर विघटन व्हावे यासाठी त्याच्यावर मीठ टाकण्यात आले होते. हंसराम हा गेल्या दीड महिन्यापासून एका घराच्या छतावर असलेल्या खोलीत भाड्याने राहत होता. तो एका विटभट्टीवर काम करत होता. त्याची पत्नी सुनिता आणि तीन मुले या घटनेनंतर बेपत्ता आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, मृत हंसराम हा व्यसनाधीन झाला होता. तो सातत्याने मद्यपान करायचा. दरम्यान, शनिवारी सकाळपासून हंसराम याच्या कुटुंबीयांचाही काही ठावठिकाणा लागत नाही आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस बेपत्ता असलेल्यांचा शोध घेत आहेत. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.