पश्चिम बंगालमध्ये महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजपचा 'हुकुमी एक्का', राजघराण्यातील राजमाता TMC ला टक्कर देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 13:51 IST2024-03-25T13:49:54+5:302024-03-25T13:51:14+5:30
अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे भाजपला मोठे बळ मिळेल. त्या महुआ मोईत्रा यांनाही टक्कर देऊ शकतात, असे निवडणूक तज्ज्ञांचे मत आहे...

पश्चिम बंगालमध्ये महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजपचा 'हुकुमी एक्का', राजघराण्यातील राजमाता TMC ला टक्कर देणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पारर्श्वभूमीरव सर्वच पक्ष आपल्या उमेदवरांची नावे जाहीर करताना दिसत आहेत. यातच रविवारी भारतीय जनता पक्षानेही आपल्या 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यात भाजपने पश्चिम बंगालमधील कृष्णानगर जागेसाठी राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. त्या येथे टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा यांना टक्कर देतील. भाजपच्या या निर्णयाकडे महुआ मोइत्रा यांच्या विरोधातील ट्रम्प कार्ड म्हणून बघितले जात आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगालमधील काही अत्यंत महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक मानला जातो.
या लोकसभा निवडणुकीत महाराजा कृष्णचंद्र यांचे नाव आत थेट राजकारणाशी जोडले गेले आहे. अमृता रॉय या कृष्णानगरच्या प्रतिष्ठित राजबाडी (रॉयल पॅलेस) च्या राजमाता आहेत. त्यांच्या संभाव्य उमेदवाहीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून कयास लावले जात होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, जिल्हा नेतृत्वाने अमृता यांना उमेदवार बनविण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. यानंतर पक्षाने त्यांच्यासोबत बोलणी करायला सुरुवात केली. बऱ्याच वेळा बोलणी झाल्यानंतर, अमृता उमेदवार होण्यास तयार झाल्या.
भाजपला होणार फायदा? -
अमृता रॉय यांनी 20 मार्च रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कृष्णानगरमधून अमृता रॉय लोकसभेच्या मैदानात आहेत. नादिया जिल्ह्याच्या इतिहासात राजा कृष्णचंद्र यांचे योगदान काय आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. महत्वाचे म्हणजे, अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे भाजपला मोठे बळ मिळेल. त्या महुआ मोईत्रा यांनाही टक्कर देऊ शकतात, असे निवडणूक तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या निवडणुकीत महुआ यांचा मोठा विजय -
टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कृष्णानगर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या त्यांना 614872 मते मिळाली होती. तर भाजपचे कल्याण चौबे यांना 551654 मतं मिळाली होती. महुआ मोइत्रा यांनी या निवडणुकीत 63218 मतांनी विजय मिळवला होता. या निवडणुकीतील महुआ यांना चोपडा, पलाशीपारा आणि कालीगंज विधानसभा मतदारसंघांतून मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती. गेल्या पाच वर्षांत कालीगंज विधानसभा मतदारसंघात भाजप मजबूत स्थितीत आला आहे.