तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 07:56 AM2023-12-06T07:56:39+5:302023-12-06T08:01:13+5:30

मध्य प्रदेशमध्ये सध्या शिवराजसिंह मुख्यमंत्री आहेत, छत्तीसगडमध्ये रमनसिंह तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.

BJP's formula 65 for election of Chief Ministers in three states madhya pradesh, rajasthan, loksabha; The meeting was held at Modi's residence | तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक

तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे भाजपला पुन्हा एकदा ताकद मिळाली आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम किंवा लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे, ३ राज्यांत भाजपाला मिळालेलं यश हे आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे. म्हणूनच, भाजपाने सत्ता मिळवलेल्या तीन राज्यांत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा लोकसभेसाठीच्या राजकीय फायद्यान्वयेच ठरला जाईल. मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक झाली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची बैठक झाली. या बैठकीत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्रीपदाच्या नावावर चर्चा झाली. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने येथील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण, अशा रणनितीने ही चर्चा झाल्याची माहिती आहे. कारण, भाजपला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी मोदींनाच विराजमान करायचे आहे. 

मध्य प्रदेशमध्ये सध्या शिवराजसिंह मुख्यमंत्री आहेत, छत्तीसगडमध्ये रमनसिंह तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. तर, राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांनीही दोनवेळा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळली आहे. त्यामुळे, या तिन्ही राज्यांत याच दिग्ग्जांना संधी मिळणार की भाजपा नवीन चेहरा शोधणार, असा प्रश्न चर्चेत आहे. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, प्रहलाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर आणि वीडी शर्मा यांचं नाव मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत आहे. तर, छत्तीसगडमध्ये रमन सिंह, अरुण साव, विष्णुदेव साय, ओपी चौधरी, रेणुका सिंह यांच्या नावावर खलबतं सुरू आहेत. त्यासह, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, बाबा बालकनाथ, दीया कुमारी, अर्जुन राम मेघवाल, अश्विनी वैष्णव आणि गजेंद्र सिंह शेखावत यांचीही नावे या शर्यतीत दिसून येत आहेत. 

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जी व्यक्ती लोकसभेच्या सर्वच जागा जिंकू शकते, अशाच उमेदवाराला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळण्याची शक्यता आहे. राजस्थान, छत्तीसगढ़ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात ६५ लोकसभा सदस्य असून भाजपाचे लक्ष्य या जागांवर आहे. दरम्यान, आजपर्यंतचा मोदी-शहा जोडीचा इतिहास पाहिल्यास अचानक नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भाजपाने धक्कातंत्र वापरले आहे. त्यामुळे, या तीन राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठीही भाजपाचे धक्कातंत्र दिसून येईल का, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सरप्राईज देतील का, अशी चर्चा जोर धरत आहे. 

दरम्यान, भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलेल्या तीन राज्यात गत २०१९ च्या निवडणुकीत लोकसभेच्या ६५ पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत भाजपाला किमान या ६२ जागांपेक्षा कमी न होऊ देण्याचे लक्ष्य आहे. 
 

Web Title: BJP's formula 65 for election of Chief Ministers in three states madhya pradesh, rajasthan, loksabha; The meeting was held at Modi's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.