कर्नाटक सरकार पाडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:50 IST2019-01-30T03:46:40+5:302019-01-30T06:50:32+5:30
कर्नाटकातील अस्थिरतेचे वातावरण आणखी दोन ते तीन आठवडे कायम राहणार

कर्नाटक सरकार पाडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरूच
बंगळुरू : लोकसभा निवडणुकांच्या आधीच कर्नाटकमधीलकाँग्रेस व जनता दल (एस) या सत्ताधारी आघाडीतील कुरबुरी वाढत असून कुमारस्वामी सरकार उलथवण्यासाठी भाजपा शेवटचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्थिरतेचे वातावरण आणखी दोन ते तीन आठवडे कायम राहील.
कुमारस्वामी सरकारला सत्तेवर येऊन सात महिनेच झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सरकार भाजपा पाडण्याची शक्यता वर्तविली जात होती. भाजपा आमदार फोडण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) तर या दोन पक्षांचे आमदार आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे भाजपाच्या आमदारांना हरयाणातील एका रिसॉर्टमध्ये नेण्यात आले होते.
मात्र त्यानंतरही माजी मंत्री रमेश जर्किहोळी यांच्यासह काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार भाजपात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातील चार आमदार सध्या मुंबईत, एक जण पुण्यात व निलंबित आमदार जे. एन. गणेश गोव्यात आहेत. विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याआधी हे सहाही जण एकत्र येऊन राजीनामा देतील, असे समजते.