भाजपचा हल्लाबोल राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर, काँग्रेसवर फोकस नको म्हणून खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:49 AM2019-04-05T05:49:33+5:302019-04-05T05:49:44+5:30

पवार कुटुंबास केले लक्ष्य : काँग्रेसवर फोकस नको म्हणून खेळी

BJP's attack on the leaders of NCP, do not focus on the Congress | भाजपचा हल्लाबोल राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर, काँग्रेसवर फोकस नको म्हणून खेळी

भाजपचा हल्लाबोल राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर, काँग्रेसवर फोकस नको म्हणून खेळी

मुंबई : राज्यात भाजप-शिवसेना युतीची लढत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ५६ पक्षसंघटनांच्या महाआघाडीशी असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे बहुतेक सगळे नेते राज्यातील प्रचारात मुख्यत्वे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही शरद पवार, अजित पवार यांना लक्ष्य करीत आहेत. भाजपला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे आव्हान मोठे वाटते म्हणून ही टीका आहे की काँग्रेसवर फोकसच राहू नये म्हणून ही खेळी आहे,या बाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.

राज्यातील पहिल्याच प्रचारसभेत वर्धा येथे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे राजकीय गुरू शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पवार यांच्या घरात कलह आहे. त्यांची पक्षावरील पकड सैल होत असून पुतणे अजित पवार पक्षाचा ताबा घेत आहेत, असे ते म्हणाले होते. बुधवारी गोंदिया येथे बोलताना त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत गर्भित इशारा दिला.
राष्ट्रवादीवर हल्लाबोलची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. बीडमधील एका मेळाव्यात बोलताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर,‘जामिनावर असलेल्या माणसाने किती बोलावे याला मर्यादा असली पाहिजे’असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला होता. महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलही मागे नाहीत. ‘सिंचन घोटाळ्याप्रकरणी कोर्टाचा निकाल कधीही येऊ शकतो.अजित पवारांसह अनेकांची चौकशी सुरू आहे’, असे म्हणत पाटील यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला भाजपने एवढे लक्ष्य केलेले नाही.

प्रचाराचा फोकस काँग्रेसवर नसावा म्हणून भाजपाचे नेते हेतुपुरस्सर राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करीत असल्याचे म्हटले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांची प्रशंसा केली होती. त्यांचे बोट धरुनच आपण राजकारणात आलो आणि ते आपले राजकीय गुरू आहेत, असे विधान त्यांनी केले होते. भाजपाचे दिग्गज नेते नितीन गडकरी हेही पवार यांच्याबद्दल आदराने बोलतात.भाजपच्या परंपरागत मतदारांना ही बाब रुचलेली नव्हती. त्यामुळेही राष्ट्रवादी आणि पवार यांच्याबाबत टोकाची टीका करण्याची भूमिका भाजपने प्रचारात घेतली असल्याचे म्हटले जाते. मोदी प्रचारात वैयक्तिक टीका करीत असल्याबद्दल शरद पवार यांनी गुरुवारी तीव्र नापसंती व्यक्त केली. आपण पंडित नेहरुंपासूनच्या पंतप्रधांना ऐकले आहे. इतकी वैयक्तिक पातळीवरील टीका मोदींआधी कोणीही केलेली नव्हती, असे ते म्हणाले.

Web Title: BJP's attack on the leaders of NCP, do not focus on the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.