अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:19 IST2025-11-14T15:17:26+5:302025-11-14T15:19:33+5:30
अंता पोटनिवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी विजय झाला आहे. काँग्रेसने भाजपा उमेदवाराला १५ हजार मताधिक्यांनी हरवले आहे.

अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
बांरा - राजस्थानच्या अंता विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रमोद भाया यांनी भाजपा उमेदवार मोरपाल सुमन यांना १५ हजार ५९४ मतांनी हरवले आहे. याठिकाणी अपक्ष उमेदवार नरेश मीणा तिसऱ्या स्थानावर राहिले. अंतामधील विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासून तिसऱ्या नंबरवर राहिलेले भाजपा उमेदवार मोरपाल सुमन यांना अखेरच्या राऊंडमध्ये १५९ मते जास्त मिळाल्याने त्यांनी नरेश मीणा यांना पिछाडीवर टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्यामुळे राजस्थानात सत्ताधारी भाजपाची काही प्रमाणात इज्जत वाचली.
राजस्थानातील पराभवानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत म्हटलं की, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून आम्ही त्याचा सन्मान करतो असं सांगितले आहे. तर जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मला भेटला, त्यासाठी मी आभारी आहे. आमची लढाई भ्रष्टाचाराविरोधात होती. प्रामाणिकपणा हरला आणि भ्रष्टाचार जिंकला. परमेश्वर आमची परीक्षा घेत आहेत, येणाऱ्या काळात आम्ही पुन्हा मजबुतीने उभे राहून काम करू असं अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी सांगितले.
अंता पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रमोद भाया यांना ६९ हजार ५७१ मते मिळाली तर भाजपाचे मोरपाल सुमन यांना ५३ हजार ९५९ मते मिळाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी चांगली लढत दिली. त्यांनी जवळपास ५३ हजार८०० मते घेऊन सगळ्यांना आश्चर्यचकीत केले. २० राऊंडच्या मतमोजणीत चौथा राऊंड सर्वात महत्त्वाचा होता. पहिल्या तीन राऊंडमध्ये भाया पुढे होते मात्र चौथ्या राऊंडमध्ये अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी आघाडी घेतली. या राऊंडमध्ये नरेश यांना १४ हजार १२ मते तर काँग्रेस उमेदवार प्रमोद भाया यांना १३ हजार ८६० मते पडली तर भाजपा उमेदवार मोरपाल सुमन यांना ९ हजार ६५९ मते मिळाली. मात्र नरेश मीणा यांना मिळालेली ही आघाडी पुढे टिकू शकली नाही.
दरम्यान, अंता पोटनिवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी विजय झाला आहे. काँग्रेसने भाजपा उमेदवाराला १५ हजार मताधिक्यांनी हरवले आहे. ११ नोव्हेंबरला या जागेसाठी ८० टक्के रेकॉर्डब्रेक मतदान झाले होते. ही केवळ एका जागेची पोटनिवडणूक नव्हती, तर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती. याठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद जैन भाया रिंगणात होते. अंता मतदारसंघ हाडौती विभागात पडतो, जिथे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा गड मानला जातो. याठिकाणी एक्झिट पोलमध्ये भाजपाला जागा मिळेल असा अंदाज वर्तवला होता. परंतु प्रत्यक्षात निकालात काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला.